सुमनताईची खिंंड रोहित पाटील लढविणार-निवडणूक ही मिशन २०१९ आणि व्हिजन २०२४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:09 AM2019-07-13T00:09:24+5:302019-07-13T00:09:52+5:30
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या निवडणुकीची खिंड त्यांचे पुत्र रोहित पाटील लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पाटील यांचा सक्रिय
दत्ता पाटील ।
तासगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या निवडणुकीची खिंड त्यांचे पुत्र रोहित पाटील लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पाटील यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. २०२४ च्या विधानसभेसाठी रोहित पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राष्टवादीची तासगाव-कवठेमहांकाळची निवडणूक ही मिशन २०१९ आणि व्हिजन २०२४ या दृष्टिकोनातून लढवली जाणार असल्याचे स्पष्ट आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात राष्टÑवादीकडे त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुमनताई पाटील यांनी पोटनिवडणूक लढवून आमदारकीची धुरा सांभाळली. मात्र याही निवडणुकीत सर्वमान्य उमेदवार म्हणून आमदार सुमनतार्इंशिवाय दुसरा पर्याय नाही.
सुमनताइंसाठी पोटनिवडणुकीची केवळ औपचारिकता होती. मात्र या निवडणुकीत भाजपच्या झेंड्याखाली खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी एकत्रित येत लढत देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आमदार पाटील यांच्यासाठी केवळ अस्तित्वाची ठरणार नसून, त्यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या भवितव्याचा फैसला करणारीही ठरणार आहे.
पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर झालेला आमदार, असा ठपका विरोधकांकडून सुमनतार्इंवर सातत्याने ठेवण्यात आला आहे. मात्र थेट चुलीपासून विधानसभेपर्यंचा प्रवास आणि मतदारांशी सातत्याने ठेवलेला जनसंपर्क यामुळे या सहानुभूतीचे रूपांतर व्होट बँकेत झाले आहे. साडेचार वर्षातील कामगिरीच्या भरवशावरच या निवडणुकीत भाजपविरोधात रिंगणात उतरावे लागणार आहे.
या निवडणुकीत सुमनताइंच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर, काही दिवसांपासून रोहित पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वक्तृत्वशैलीसह, त्यांचे सर्वच गुण आत्मसात करीत जनमानसात लोकप्रियता मिळवली आहे. या निवडणुकीत सुमनताइंच्या प्रचाराची धुरा सांभाळून २०२४च्या विधानसभा निवडणुकीची मशागत करण्यासाठी राष्टÑवादीकडून आतापासूनच रोहित पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन समीकरणांची पायाभरणी ठरणारी ही निवडणूक राष्टÑवादीसाठी औत्सुक्याची ठरणार आहे.
संपूर्ण राज्यभरात कुतूहल
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांची वक्तृत्वशैली हुबेहूब आर. आर. पाटील यांच्यासारखी आहे. ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणून चर्चेत येणारे रोहित पाटील आर. आर. पाटलांचा वारसा कसा सांभाळणार, याचे राज्यभर कुतूहल आहे.