रोहयोच्या केंद्रीय पथकाकडून शेटफळेत कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:22+5:302021-02-12T04:24:22+5:30
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केंद्रीय पथकाकडून बुधवारी करण्यात आली. यामध्ये ...
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केंद्रीय पथकाकडून बुधवारी करण्यात आली. यामध्ये विभागीय आयुक्त नैना बुहारांडो यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी २०१५-१६ या वर्षी शेटफळे येथे रोहयोच्या माध्यमातून कुशल कामाची पाहणी झाली होती. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागातील बिहार वृक्ष लागवड पॅटर्न, सिमेंट काँक्रीटचे बनविलेले रस्ते यासह अन्य कामांची पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी केली.
यावेळी नैना बुहारांडो यांनी समृद्ध गाव योजनेची माहिती शेटफळे गावातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांना दिली. ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने रोहयो विभागाच्या विविध सात योजनांचे एकत्रीकरण करून समृद्ध गाव योजना तयार केली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेटफळे गाव या योजनेत समाविष्ट नसल्याचे पदाधिकारी यांनी सांगितल्यावर विभागीय आयुक्त नैना बुहारांडो यांनी शेटफळे गाव समृद्ध योजनेत समाविष्ट करण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी विभागीय आयुक्तांनी रोहयोच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. रोहयोतून अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना शासनाने एकत्रित केल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र रोहयोत कमी पडत असून, शेतकऱ्यांनी समृद्ध गाव योजनेअंतर्गत लाभ घेऊन आपल्यासह गावाचा विकास साधण्याचे आवाहन केले.
यावेळी विभागीय कार्यक्रम विस्तार अधिकारी अभिजित खाडे, नूतन सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, प्रगतशील शेतकरी ग्रामपंचायत सदस्य रूपेश गायकवाड, सुभाष बाड, नायब तहसीलदार डी. एस. राठोड, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.