विक्रमभाऊंच्या भूमिकेने विरोधक कोंडीत
By admin | Published: July 22, 2016 11:18 PM2016-07-22T23:18:48+5:302016-07-23T00:13:03+5:30
इस्लामपूर पालिका निवडणूक : राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढतोय
अशोक पाटील-- इस्लामपूर पालिकेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीला शह देण्याचा विडा स्वाभिमानीच्या खासदार राजू शेट्टी, ना. सदाभाऊ खोत यांनी उचलला आहे. परंतु भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील हे भाजप झेंड्याखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकत्र करणाऱ्या नेत्याची मुस्कटदाबी होत चालली आहे. या विरोधकांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढत आहे.
गत पालिका निवडणुकीत विरोधकांची हवा चांगली होती. परंतु अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीतील काही उमेदवारांनी विरोधी गटातील उमेदवारांशी अंतर्गत साटेलोटे केले, तर शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी सवतासुभा मांडला. त्यामुळे विरोधकांतील मातब्बरांना चांगलाच धक्का बसला. यातून विरोधक सावरतील असा राजकीय अंदाज होता.
परंतु विक्रमभाऊ पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार, बाबा सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्यामधील अंतर्गत दरी रुंदावत गेली आहे. त्यामुळे सध्या ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. याचाच फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीला झाला आहे.
गत निवडणुकीत विरोधकांना झटका बसूनही त्यांनी आत्मपरीक्षण तर केलेच नाही, उलट भाजपच्या झेंड्याखाली राहून नगरसेवक बाबा सूर्यवंशी आणि भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील यांनी वेगवेगळी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. आजही या दोघांमधील दरी रुंदावलेलीच आहे.
शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार हे दोघे एकदिलाने पवार आॅईल मिलसमोरील पिंपळाच्या झाडाच्या साक्षीने एकत्रित होते. परंतु अलीकडे या दोघांमध्येही मोठी दरी पडली आहे. या दोघांना एकत्र करण्यासाठी खा. राजू शेट्टी, ना. सदाभाऊ खोत आणि नानासाहेब महाडिक यांचे प्रयत्न दिसून येणार आहेत.
एकूणच भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे इस्लामपुरात शिरकाव केलेल्या महाडिक युवा शक्तीच्या राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना आपली भूमिका आजही गुलदस्त्यात ठेवली आहे. विरोधकांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे, एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढत आहे, हे मात्र निश्चित.
विरोधकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न
इस्लामपूर नगरपरिषदेत माजी नगरसेवक एल. एन. शहा यांचा विरोधकांतील सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. ते कोणत्याही पक्षाशी निगडित नाहीत. पण सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात प्रामाणिकपणे ते लढा देत असतात. त्यांना मानणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत विरोधकांची ताकद एकत्र झाली नाही तरी, स्वत:च्या प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात उतरून ते आपली ताकद दाखवू शकतात.
शिवसेनाही ‘हम भी कुछ कम नही’च्या भूमिकेत
सध्या विक्रमभाऊ पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, आनंदराव पवार आणि वैभव पवार या चौघा नेत्यांच्या भूमिका चारी दिशेला विभागल्या आहेत. बाबा सूर्यवंशी विरोधकांची मोट बांधण्यास राजी आहेत. परंतु विक्रमभाऊ पाटील मात्र भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आनंदराव पवार यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ अशी भूमिका घेतली आहे.