शासकीय रुग्णालयाच्या छताचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:42+5:302021-04-14T04:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमधील छताचा स्लॅब सोमवारी (दि. १२) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमधील छताचा स्लॅब सोमवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला. यावेळी पोर्चमध्ये कोणीच नव्हते. तसेच रुग्णवाहिकांची ये-जा सुरू नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तत्काळ हा भाग बंद केला आहे.
सांगलीसह कोल्हापूर, कर्नाटकातील रुग्णांचा आधारवड म्हणून शासकीय रुग्णालयाची ओळख आहे. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स, रुग्णवाहिका यांची सतत वर्दळ सुरू असते. केसपेपर, ओपीडीकडे जाण्यासाठीचा हा मुख्य मार्ग असल्याने लोकांची येथे नेहमीच गर्दी असते. रुग्णांचे नातेवाईकही पोर्चखालीच बसलेले असतात. शिवाय मुख्य प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकही दिवसरात्र तैनात असतात.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाच्या पोर्चचा काही भाग मोडकळीस आला होता. त्याबाबत तक्रारीही झाल्या. पण प्रशासनाने फारसे गांभीर्याने ही बाब घेतली नाही. त्याची डागडुजी करण्यात आली नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी अवकाळीचा पाऊसही जोरदार झाला होता. पोर्चमधील स्लॅबमधून अनेकदा पाण्याची गळतीही सुरू असायची. त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाले होते. सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अचानकच या पोर्चमधील स्लॅबचा एक भाग कोसळला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज आला. या आवाजाने रुग्णालयामधील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी यांसह अनेकजण बाहेर धावले. स्लॅब कोसळल्याचे पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चौकट
स्ट्रक्चरल ऑडिट करा : साखळकर
शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ते म्हणाले की, रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सांगली जिल्हा तसेच शेजारील कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जुन्या संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व आनुषंगिक कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून करण्यात द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.