काँग्रेस-राष्टवादीत चार जागांसाठी रस्सीखेच -: विधानसभा निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:34 PM2019-07-25T23:34:42+5:302019-07-25T23:36:54+5:30
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत.
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू असताना, चार जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ही मागणी इच्छुक व स्थानिक पदाधिकाऱ्यांतून होत असली तरी, त्याची दखल घेत जागावाटपाच्या बैठकीतही यावरून चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. जत, मिरज, पलूस-कडेगाव व शिराळा या चार जागांच्या अदलाबदलीची मागणी जोर धरत आहे.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत. यातील इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी आघाडीत चुरस दिसत नाही. जत आणि मिरज मतदारसंघात दोन्ही पक्षांकडे सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. तेथे चुरस दिसून येत आहे. राष्टवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी मिरजेतील इच्छुकांनी, काँग्रेसकडील जागा राष्टवादीने घ्यावी, अशी आग्रही मागणी केली. पलूस-कडेगाव मतदारसंघातून राष्टवादीकडे केवळ शरद लाड यांचा एकमेव अर्ज असला तरी, त्यांनीही या जागेची मागणी करीत, किती दिवस दुसऱ्यांसाठीच लढायचे, असा सवाल उपस्थित केला. लाड यांचा मोठा गट आहे. या गटाचाही या जागेसाठी आग्रह सुरू आहे.
जत विधानसभा मतदारसंघ राष्टवादीकडे असला तरी, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यासह अन्य इच्छुकांनी ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला जोर येत असतानाच राष्टवादीच्या येथील इच्छुकांनी, ही जागा राष्टवादीने कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, असे सांगितले आहे. मिरजेच्या जागेसाठीही राष्टवादीने हट्ट धरला आहे. काँग्रेसपेक्षा राष्टवादीकडे अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. शिराळा मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसकडे गेला होता, मात्र आता राष्टवादीनेही त्यावर दावा केला आहे.
या जागांसाठी दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच अनुभवास येत आहे. निवडणुका जवळ येतील तशी ही रस्सीखेच अधिकच रंगतदार अवस्थेत येणार आहे. काँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचा व जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, याकडे जिल्ह्यातील सर्व इच्छुकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आघाडीचा : समीकरणांवर परिणाम
वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांशी आघाडी झाली, तर त्यांनाही यातील काही जागा द्याव्या लागणार असल्याने, पुन्हा गणित बदलणार आहे. जत व मिरज या दोन जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. या दोनच मतदारसंघात तीन पक्षांची दावेदारी असल्याने, याबाबत निर्णय घेताना पक्षीय नेतृत्वाची कसरत होणार आहे. या दोन्ही पक्षांशी आघाडी झाली नाही तरीही रस्सीखेच थांबणार नाही.
नाराजीची भीती
जागा बदल झाले तरीही नाराजी आणि झाले नाही तरीही नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना आणि पर्यायाने आघाडीला करावा लागणार आहे. जत आणि मिरज या मतदारसंघात सर्वाधिक नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना करावा लागण्याची शक्यता आहे.