गुलाबाचा दर वधारला, ‘व्हॅलेंटाईन डे’साठी मागणी वाढली; रेल्वेने मिरजेतून दिल्लीला निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:22 PM2024-02-12T14:22:17+5:302024-02-12T14:24:01+5:30
कृत्रिम फुलांची एण्ट्री
सदानंद औंधे
मिरज: ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. गेली आठवडाभर मिरजेतून दररोज दोनशे बॉक्स जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाब रेल्वेने दिल्लीला जात आहेत.
सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, विटा व कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, कोथळी, नांदणी परिसरातील हरितगृहात जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाबाचे उत्पादन होते. जरबेरा, कार्नेशियन या फुलांना सजावटीसाठी व ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल गुलाबाच्या फुलांना मागणी असते. मिरजेतून निजामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीकरांसाठी व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब पाठविला जात आहे. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन नसल्याने दिल्लीला मागणी व दर अधिक आहे. त्यामुळे दिल्लीला निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. या दिवशी प्रेमाच्या जिवलग व्यक्तीला गुलाबाचे फूल देण्याची पद्धत असल्याने व्हॅलेंटाईन साठी लाल गुलाबाचा दर वधारला आहे.
एरव्ही दहा रुपये नगाचा दर असलेल्या डच गुलाबाच्या फुलांना प्रेमदिनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे. जरबेरा व कार्नेशियन या फुलांनाही २० रुपये दर मिळत आहे. मिरजेतून दररोज रात्री गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून दिल्लीला फुले पाठविण्यात येतात. उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दिल्लीला फुले जात आहेत. या फुलांचा दिल्लीत शीतगृहात साठा करण्यात येतो.
मिरज रेल्वे स्थानकातून दररोज दोनशे बॉक्स गुलाब व जरबेरा दिल्लीला जात असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेच्या माल वाहतूक भाड्यामुळेही फुलांची निर्यात महाग आहे. फुलांच्या एका बॉक्सला आकारमानाप्रमाणे अडीचशे रुपये आकारणी करण्यात येते. रेल्वेतून फुले पाठविण्यासाठी आकारमानाऐवजी प्रतिकिलो दर आकारणीची निर्यातदारांची मागणी आहे.
कृत्रिम फुलांची एण्ट्री
गेल्या काही वर्षांत व्हॅलेंटाईन डे साठी कृत्रिम फुलांचाही वापर सुरू झाला आहे. कृत्रिम फुले तुलनेने स्वस्त असल्याने मोठ्या शहरात फुलांची मागणी घटत असल्याचे निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.