शेतकऱ्याने पपई बागेवर फिरविला रोटर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:12 AM2019-12-23T03:12:42+5:302019-12-23T03:13:35+5:30
दराअभावी नैराश्य : खरेदीदार न मिळाल्याने फळे रस्त्यावर फेकली
कासेगाव (जि. सांगली) : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकºयाने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे कारण देऊन घेण्यास नकार दिला. अन्य कोणत्याही ठिकाणी खरेदीदार न मिळाल्याने नाराज होऊन शेतकºयाने पपई रस्त्यावर फेकून दिली. नैराश्येतून या शेतकºयाने १ एकरातील उर्वरीत पपईच्या पिकावर रोटर फिरवून सर्व पीकच जमीनदोस्त केले.
कासेगाव येथील विश्वनाथ बाबूराव वगरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी कर्ज काढून एक एकर पपईची लागवड केली होती. मोठ्या कष्टाने त्यांनी पपईची बाग जोमाने आणली होती. त्यासाठी सुमारे १ लाखापेक्षा जास्त खर्च केला होता. त्यामुळे फळधारणाही चांगली
झाली होती. मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पपईला मागणी व दरही चांगला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पपई तोडणीस त्यांनी सुरुवात केली होती. मात्र अचानक बाजारपेठेत पपईचा दर खूपच कमी झाला. पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही मिळत नसल्याने त्यांनी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक व्यापाऱ्यांना २ रुपये किलो दराने ६ टन पपईची विक्री केली. चार दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला विचारून पपईची तोडणी केली. ४ टन पपई संबंधित व्यापाºयाला पाठविल्या. मात्र जास्त मालाची आवक झाल्याचे कारण देऊन त्याने तो माल उतरवून घेण्यास नकार दिला. शेतकºयाने वारंवार विनंती करूनही तो माल व्यापाºयाने खरेदी केला नाही. त्यानंतर विश्वनाथ वगरे यांनी इतर ठिकाणी कोणी व्यापारी हा माल घेते का, ते पाहिले. पण स्थानिक कोणीच घ्यायला तयार नव्हते. मुंबई, पुणे येथील वाहतूक खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने, तिकडे पपई पाठवून तोटाच होणार हे लक्षात आले. या सर्व नैराश्येतून भरलेली पपईची गाडी त्यांनी कासेगावात आणली आणि सर्व पपई रस्त्यावर ओतल्या. एवढेच नव्हे, तर एक एकरातील सर्व पपईची झाडे रोटरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.