जिल्ह्यात एसटीची साडेचार कोटीची ‘दिवाळी’
By admin | Published: November 16, 2015 11:20 PM2015-11-16T23:20:54+5:302015-11-17T00:04:40+5:30
विभागाला दिलासा : सणामुळे सरासरी उत्पन्नात दीड कोटीची भर, फेऱ्यांच्या नियोजनामुळे यश
सांगली : वाढत चाललेली खासगी वाहनांची संख्या आणि सवलती मिळविण्यासाठीच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने, एसटीला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण यंदाच्या दिवाळीने मात्र एसटीला चांगलाच हात दिल्याचे दिसून आले. त्यामुळे ११ ते १५ नोव्हेंबर या अवघ्या पाच दिवसात एसटीच्या सांगली विभागाने ४ कोटी ४३ लाख ७३ हजार २०० रुपयांचे उत्पन्न मिळवत नवा विक्रम केला आहे. या कालावधित विभागातील एसटीने १४ लाख ५ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास केला.
दिवाळीचा सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी परतण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीलाच प्राधान्य देतात. गेल्या आठवड्यापासून दिवाळी हंगाम सुरु होताच यंदाचा हंगाम एसटीला फायदेशीर होण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. केवळ सांगलीच नव्हे, तर जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून मुंबई, पुणेसह प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यातही दिवाळीच्या अगोदर दोन दिवस व त्यानंतर भाऊबिजेला होणारी गर्दी लक्षात घेता, महत्त्वाच्या मार्गावर जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याने, एसटीला याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. दिवाळीनंतरच्या रविवारी प्रवाशांची मोठी गर्दी होणार, हे गृहीत धरुन प्रशासनाने यादिवशी सर्वच महत्त्वाच्या मार्गावर जादा फेऱ्यांचे नियोजन करीत गर्दीचे ‘कॅश’मध्ये रूपांतर करुन घेतले.
दिवाळीत ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाला २ लाख ४२ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास करीत एसटीने ६६ लाख २६ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळवले. खऱ्याअर्थाने यादिवशी लक्ष्मीने एसटीला ‘धनलाभ’ मिळवून दिला. १२ नोव्हेंबरला २ लाख ५४ हजार ९०० किलोमीटरचा प्रवास करीत ७० लाख ६३ हजाराचे उत्पन्न मिळाले.
१३ नोव्हेंबरला ३ लाख ७ हजार ९०० किलोमीटरचा प्रवास करत सांगली विभागाने १ कोटी १ लाख ३७ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न मिळवत ‘दिवाळी’ साजरी केली. १४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा एसटीने उत्पन्नात कोटीच्या कोटी उड्डाणे घेत १ कोटी १६ हजार ९२८ रुपयांचे उत्पन्न मिळवले. यादिवशी ३ लाख ८ हजार २०० किलोमीटरचा प्रवास एसटीने केला, तर दिवाळीच्या सुट्टीतील शेवटचा दिवस असलेल्या रविवारी १५ नोव्हेंबरला एसटीचा २ लाख ९१ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास करत १ कोटी २५ लाख २९ हजार ३०० रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळवले.
दिवाळीव्यतिरिक्त इतर हंगामांचा विचार करता, सांगली विभागाने आपल्या उत्पन्नात सरासरी दीड कोटींची भर घातली. सांगली विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. नेहमीच सवलतींच्या ओझ्याखाली रुतलेले एसटीचे चाक काहीप्रमाणात का होईना बाहेर येण्यासाठी दिवाळीने चांगलाच हातभार लावला. (प्रतिनिधी)
आॅनलाईन आरक्षणावर प्रवाशांच्या उड्या
आजपर्यंत केवळ रेल्वेपुरते लक्षात राहणारे तिकीट आरक्षणाचे नियोजन आता एसटीच्या प्रवाशांनीही अंगिकारल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला आॅनलाईन आरक्षणावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. दिवाळी आधी पुण्यातून सांगलीसाठी ३९ बसेसचे आॅनलाईन आरक्षण फुल्ल झाले होते. रविवारी १५ नोव्हेंबरला पुण्याला प्रवास करण्यासाठी २२ गाड्यांचे बुकिंग शनिवारीच फुल्ल झाले होते. त्यामुळे प्रवाशांनी यंदा एसटीच्या आॅनलाईन बुकिंगचा चांगला फायदा घेतल्याचे दिसून आले.
तिकीट दरवाढीचा प्रवाशांवर परिणाम नाही
खासगी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून नेहमीच हंगामात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन तिकीट दरात वाढ केली जाते. यंदा एसटीनेही हा फॉर्म्युला वापरत गर्दीला ‘कॅश’मध्ये रूपांतरित करून घेतले. यंदा प्रथमच एसटीने दिवाळीआधी तिकीट दरात १० टक्के वाढ केली होती; मात्र या दरवाढीचा कोणताही परिणाम प्रवाशांवर झाला नाही, उलट यंदा प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.