साडेसहा हजारांचा भाव असूनही शेतकऱ्यांची सूर्यफुलाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:18 PM2021-12-01T18:18:28+5:302021-12-01T18:20:20+5:30
सूर्यफुलास प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तरीही शेतकरी सूर्यफूल पेरणीऐवजी ज्वारी पेरणीलाच प्राधान्य देत आहेत.
अशोक डोंबाळे
सांगली : सूर्यफूल तेल आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे सूर्यफुलास प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तरीही शेतकरी सूर्यफूल पेरणीऐवजी ज्वारी पेरणीलाच प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात सूर्यफूल पेरणी एक हजार ४७८ हेक्टर, तर ज्वारीची पेरणी एक लाख १४ हजार ८९४ हेक्टरपर्यंत गेली आहे.
ज्वारीचा अन्नधान्यासाठी, तर कडब्याचा पशुधनासाठी उत्तम आहार म्हणून वापर केला जात आहे. म्हणूनच शेतकरी ज्वारी पेरणीस आजही प्राधान्य देत आहे. रब्बी पेरणीच्या पन्नास टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होत आहे. उर्वरीत पन्नास टक्के क्षेत्रात गहू, हरभरा, भुईमुग अन्य रब्बी पिके घेतली जात आहेत. सुर्यफुलाला मागणा असूनही म्हणावे तेवढे क्षेत्र वाढत नाही.
ज्वारीचा पेरा का वाढला
आरोग्याची श्रीमंती म्हणून ज्वारीकडे पाहिजे जात आहे. ज्वारीच्या भाकरीला तेल, तूप लागत नाही. पचायला अत्यंत सुलभ आहे. ज्वारीमुळे बद्धकोष्ठता, मूळव्याधीचा त्रास होत नाही. मूतखड्याचा त्रास टाळता येतो. गव्हामुळे बद्धकोष्ठता तसेच ग्लुटोनमुळे त्रास होऊ शकतो. गव्हाच्या तुलनेत ज्वारीत कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला ऊर्जा लवकर मिळते. म्हणूनच ग्रामीण भागाबरोबरच आता शहरातही ज्वारीला मागणी वाढली आहे.
सूर्यफुलाची पेरणी का घटली?
सूर्यफुलाचे एकरी उत्पादन कमी आणि दराचीही खात्री नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील सूर्यफुलाची पेरणी क्षेत्र घटले आहे. दहा वर्षांपूर्वी पाच हजार हेक्टरवर सूर्यफूल पेरणी होत होती. सध्या केवळ एक हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल पेरणी होत आहे. यापेक्षाही अन्य पिकांमधून फायदा जास्त असल्यामुळे शेतकरी अन्य पिकेच घेत आहेत, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
सूर्यफूल पीक फायदेशीर : विनायक पवार
सूर्यफुलांपासून तयार करण्यात आलेले तेल अनेकांच्या आहारात असते. आहारात याचा समावेश केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. केस आणि त्वचेसाठी सूर्यफूल हे फारच फायद्याचे असते. व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा फॅटी असते. जे अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. उत्पादनही चांगले आणि क्विंटलला साडेसहा हजार रुपये दरही मिळत आहे, असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी व्यक्त केले.
भाव जास्त असूनही सूर्यफुलाकडे पाठ का?
उत्पादन कमी आणि दरही जास्त नसल्यामुळे सूर्यफूल पीक परवडत नाही. म्हणूनच आम्ही भाजीपाल्यासह ज्वारी पिकांना प्राधान्य देतो. - सुनील शिंदे, शेतकरी.
सूर्यफूल पिकाचा हमीभाव प्रतिक्विंटल सात हजाराहून अधिक दिला पाहिजे, तरच सूर्यफूल पीक घेण्याकडे शेतकरी वळणार आहे. उत्पादन कमी आणि दरही चांगला मिळत नसल्यामुळे शेतकरी सूर्यफूल पीक घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. - सदाशिव माने, शेतकरी.
पिकाचा पेरा किती? आणि सध्याचा भाव
पीक क्षेत्र (हेक्टर) सध्याचा भाव (प्रतिक्विंटल)
ज्वारी १,१४,८९४ ३५००
गहू २३,२०८ ३२००
सूर्यफूल १४७८ ६५००
मका ८९०९ १९००