तंतुवाद्य कारागीरांसाठी साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान -मिरजेत क्लस्टर योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:23 AM2019-01-08T00:23:03+5:302019-01-08T00:24:46+5:30
मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन ...
मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत क्लस्टर योजनेसाठी अर्धा एकर जागा देण्यात आली असून, या जागेत इमारतीच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे.
तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कारागीरांच्या अनेक पिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. महागाई, कच्च्या मालाचे वाढते दर, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या तंतुवाद्यनिर्मिती कलेस हस्तकलेचा दर्जा देऊन शासनाच्या मदतीसाठी तीन वर्षांपूर्वी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे क्लस्टर योजनेची घोषणा करण्यात आली.
मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी संपूर्ण देशात व परदेशात लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे; मात्र विविध अडचणींमुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या घटत आहे. इलेक्ट्रॉनिक तनपुºयाच्या आक्रमणामुळे तंतुवाद्यनिर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाचे वाढते दर, अत्यंत कष्टाचे काम व तुटपुंज्या उत्पन्नामुळे कारागीरांची संख्या कमी होऊन नवी पिढी व्यवसायात येण्यासाठी इच्छुक नाही. या पार्श्वभूमीवर लघुउद्योग विकास महामंडळाअंतर्गत तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देऊन तंतुवाद्यनिर्मिती व्यवसाय टिकविण्यासाठी मिरजेत तीन वर्षापूर्वी क्लस्टर मंजूर करण्यात आले.
क्लस्टर योजनेअंतर्गत कारागीरांना विमा, तंतुवाद्य निर्मात्यांना दुकाने, संशोधन व निर्मितीसाठी जागा उपलब्ध करुन तंतुवाद्यांना बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिरजेतील औद्योगिक वसाहतीत शासनाच्या अर्धा एकर जागेत तंतुवाद्य कारागीरांना सामुदायिक सुविधा केंद्र निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. क्लस्टर योजनेसाठी सुमारे दोनशे तंतुवाद्य कारागीरांची यादी तयार करून मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे.
क्लस्टर योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान व सुविधा मिळविण्यासाठी ३० टक्के रक्कम कारागीरांना भरली आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कारागीरांच्या सामुदायिक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे मिरज म्युझिकल ईन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले.
योजना दिलासादायक ठरणार
देशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबोºयाचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबोºयास परदेशातही मागणी आहे. विशिष्ट, मजबूत, टिकाऊ भोपळ्यामुळे मिरजेतील सतार, तंबोºयाचा देशात लौकिक आहे. मजुरी, कच्च्या मालातही मोठ्या दरवाढीच्या तुलनेत वाद्यांच्या दरात वाढ झालेली नाही. मिरजेतील तंतुवाद्यांना कोलकाता व लखनऊ येथील स्वस्त दराच्या तंतुवाद्याशी स्पर्धा करावी लागते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तंतुवाद्य व्यवसायासाठी क्लस्टर योजना दिलासा ठरणार आहे.