इस्लामपुरात तीन लाखांची रोकड लुटली
By admin | Published: October 15, 2016 09:29 PM2016-10-15T21:29:22+5:302016-10-15T21:29:22+5:30
दोघा लुटारूंनी दुचाकी वेगाने अंगावर घालण्याचा बहाणा करीत पाठीमागे बसलेल्या महिलेच्या हातातील तीन लाखांची बॅग हिसडा मारून पळवली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. १५ - शहरातील सावकार कॉलनी परिसरात नव्यानेच स्थलांतरित झालेल्या स्टेट बँक शाखेतून तीन लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून निघालेल्या ढवळीच्या दाम्पत्याला पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी दुचाकी वेगाने अंगावर घालण्याचा बहाणा करीत पाठीमागे बसलेल्या महिलेच्या हातातील तीन लाखांची बॅग हिसडा मारून पळवली.
त्यानंतर त्याच वेगात या लुटारुंनी पोबारा केला. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामचंद्र बापू पाटील (वय ५७, रा. ढवळी, ता. वाळवा) यांनी पोलिसात वर्दी दिली आहे. पाटील पत्नी सौ. मंगल यांच्यासह सावकार कॉलनीतील स्टेट बँक शाखेत आले होते. तेथून त्यांनी तीन लाख रुपयांची रोकड काढली. ही रोकड बॅगेत ठेवून ती बॅग त्यांनी पत्नी मंगल यांच्याकडे दिली.
तेथून दोघे आपल्या मोटारसायकलवरून ढवळीला जाण्यासाठी पेठ-सांगली रस्त्याकडे निघाले. बँकेपासून अवघ्या शंभर फूट अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून वेगाने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंनी दुचाकी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा बहाणा केला. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या मंगल पाटील यांच्या हातातील बॅग एकाने हिसडा मारून ताब्यात घेतली. त्यानंतर क्षणात दोघे त्याच मार्गाने पुढे आष्टा रस्त्याकडे सुसाट वेगाने निघून गेले.
अचानक घडलेल्या या घटनेने पाटील दाम्पत्य भयभीत झाले होते. त्यांनी आरडा-ओरडा करण्यापूर्वीच लुटारू पसार झाले होते. त्यांनी घटनेची माहिती बँक अधिकारी व पोलिसांना दिली. पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदीही केली. मात्र लुटारू सापडले नाहीत. दरम्यान, हे लुटारू बँक परिसरात पाळत ठेवून थांबले असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिस उपनिरीक्षक जीवन राजगुरू अधिक तपास करीत आहेत.