नरेंद्र मोदींवर ‘आरएसएस’चा कंट्रोल
By admin | Published: January 18, 2016 12:08 AM2016-01-18T00:08:05+5:302016-01-18T00:36:06+5:30
कुमार सप्तर्षी : देश वाचवायचा असेल, तर नव्याने राजकीय सुरुवात करण्याची गरज
इस्लामपूर : लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मते दिली, ते पंतप्रधान झाले़ मात्र त्यांच्यावर ‘आरएसएस’चा कंट्रोल आहे़ सध्या लोकांना संमोहित करून पुरोगामी विचारांच्या लोकांचे मुडदे पाडले जात आहेत, हे सर्वच राजकीय पक्षांना मोठे आव्हान आहे. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वांनाच नव्याने राजकीय सुरुवात करावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ़ कुमार सप्तर्षी यांनी दिला़ राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘माझे आठवणीतील बापू’ या विषयावर बोलत होते़ याप्रसंगी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि़ प़ अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, विश्वासराव पाटील उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी गोमांस, गोहत्या यासारखे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लोकशाही हवी का वेदशाही हवी? असा सवाल करीत, योगासने करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कमी केले जात आहे, असा आरोप सप्तर्षी यांनी केला़
ते म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी मधल्या दलालांना बाजूला करून थेट विठ्ठलाशी नाते जोडणारी अध्यात्म क्रांती केली़ त्यातून सर्व जातीत संत तयार झाले. आपण ‘राजकीय लाभार्थी’ होऊ नका़ आपले जीवन ‘हंगामी’ आहे, याची सदैव जाणीव ठेवा आणि जेवढ्या गरजा, तेवढेच मिळवा़ मोदींच्या ‘कॉँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा समाचार घेताना ‘महात्मा गांधींनी घालून दिलेला विचार, संस्कृती कशी जाईल? आणि ती गेली तर देश म्हणून आपण एकत्र राहू का? असा सवाल त्यांनी केला़
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले.
विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़ पपाली कचरे, प्रा. शामराव पाटील, आबासाहेब देशमुख, विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, बी. एस़ पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, मनोज शिंदे, बी. डी़ पवार, बाबासाहेब मुळीक, किसन जानकर, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, सदाशिव पवार, माणिकदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साधेपणा भावला...
बापूंच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा साधेपणा मला भावला़ त्यांनी आयुष्यभर ‘सामान्य माणसा’चे जीवन सुखी करण्यासाठी अपार कष्ट घेतले, या शब्दात सप्तर्षींनी राजारामबापूंना आदरांजली अर्पण केली.