सांगली जिल्ह्यातील २,१३७ शाळांमध्ये आरटीई प्रवेश सुरू, प्रवेशासाठी नवे नियम काय..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Published: April 17, 2024 05:54 PM2024-04-17T17:54:36+5:302024-04-17T17:55:11+5:30

२६ हजार ३४३ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

RTE admissions started in 2,137 schools of Sangli district | सांगली जिल्ह्यातील २,१३७ शाळांमध्ये आरटीई प्रवेश सुरू, प्रवेशासाठी नवे नियम काय..जाणून घ्या

सांगली जिल्ह्यातील २,१३७ शाळांमध्ये आरटीई प्रवेश सुरू, प्रवेशासाठी नवे नियम काय..जाणून घ्या

सांगली : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२४ - २५च्या प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया अखेर मंगळवारपासून सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ही अर्ज प्रक्रिया इतकी विलंबाने सुरू झाली असून, आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करावा लागणार आहे. जिल्ह्यातील २ हजार १३७ शाळांमध्ये २६ हजार ५४३ रिक्त जागांसाठी प्रवेश सुरू झाला आहे.

वंचित, सामाजिक दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. या शाळांमधील २५ टक्के जागा ‘आरटीई’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. यंदा ही प्रक्रिया जवळपास दोन महिने रखडली होती. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत या वर्षीपासून काही बदल केले आहेत. या बदलाच्या अंमलबजावणीसाठी शाळा नोंदणीलाच उशीर झाल्याने अर्ज प्रक्रियेलाही विलंब झाला.

त्यामुळे गेली अनेक वर्षे फेब्रुवारीत सुरू होणारी अर्ज प्रक्रिया यंदा एप्रिल महिन्यात सुरू झाली आहे. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्यास शिक्षण विभागाने सद्यस्थितीत ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, यंदा वाढलेल्या शाळा आणि जागा लक्षात घेता, नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २ हजार १३७ शाळांनी नोंदणी केली आहे. या प्रवेशांसाठी २६ हजार ३४३ जागा रिक्त आहेत.

प्रवेशासाठी असे आहेत नवीन नियम

या बदलांनुसार विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान, अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल, तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश मिळणार आहे.

आरटीई योजनेत जिल्ह्यातील २ हजार १३७ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २६ हजार ३४३ रिक्त जागांसाठी पालकांनी ३० एप्रिलपर्यंत अर्ज करावेत. नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: RTE admissions started in 2,137 schools of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.