आरटीओ कार्यालय होणार कवलापुरात!

By admin | Published: October 13, 2015 10:13 PM2015-10-13T22:13:11+5:302015-10-13T23:55:50+5:30

अखेर शिक्कामोर्तब : ३० एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर, सकारात्मक चर्चा--लोकमत विशेष

RTO office will be held at Kavalapur! | आरटीओ कार्यालय होणार कवलापुरात!

आरटीओ कार्यालय होणार कवलापुरात!

Next

सचिन लाड -- सांगली--येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या जागेचा प्रश्न जवळपास मिटल्यात जमा आहे. आरटीओ दशरथ वाघुले यांनी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर कार्यालयासाठी ३० एकर जागेची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना सादर केला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात कवलापुरात नूतन सुसज्ज जागेत आरटीओ कार्यालय स्थलांतरित होणार आहे.
प्रत्येकवर्षी महसूल जमा करण्यात कोटीचे शतक मारणारे आरटीओ कार्यालय अद्याप अडगळीत आहे. सांगलीपासून दोन किलोमीटर अंतरावर हे कार्यालय असल्याने नागरिकांना गैरसोयीचे ठरले आहे. प्रशासकीय काम सांगलीत आणि वाहनांचे नूतनीकरण, वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्याची परीक्षा सावळी (ता. मिरज) येथे घेतली जाते. सांगलीतील सध्याचे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. तेही अपुरे पडत आहे. एकाच छताखाली कार्यालय नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. दहा वर्षापूर्वी सावळीला कार्यालय नेण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण या जागेवर तेथील एका शेतकऱ्याने हक्का सांगितला. त्यामुळे हा वादाचा मुद्दा बनला. सध्या या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. आज ना उद्या निकाल लागेल, या आशेवर तत्कालीन आरटीओ अभय देशपांडे, विलास कांबळे, सुधाकर बुधवंत, हरिश्चंद्र गडसिंग होते. या सर्व अधिकाऱ्यांनी जागेसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.
गडसिंग यांनी आपटा पोलीस चौकीजवळील महापालिकेची शाळा क्रमांक आठ कार्यालयासाठी घेण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेच्या महासभेत ही जागा देण्याचा ठराव झाला होता. मात्र तोपर्यंत गडसिंग सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नव्याने आलेले आरटीओ दशरथ वाघुले यांनी भाड्याच्या जागेत जाण्याऐवजी स्वत:च्या मालकीच्या जागेत कार्यालय नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी जागेचा शोध सुरु ठेवला होता. त्यांचा जागेचा हा शोध कवलापूर येथे थांबला आहे. नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा पडून आहे. यातील तीस एकर जागेची त्यांनी मागणी केली असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. येत्या काही दिवसात ही जागा ताब्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या जागेवर बांधकाम सुरु होईल. इमारत पूर्ण होईपर्यंत कदाचित वाघुले यांची बदली होईल. परंतु त्यांच्या प्रयत्नामुळे कार्यालय स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागला आहे.


कवलापूरची जागा मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. तीस एकर जागेची मागणी केली आहे. किमान २५ एकर तरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. अन्य शासकीय कार्यालयांनीही या जागेची मागणी केली आहे. पण आरटीओ कार्यालय होण्याची काही अडचण ठरेल, असे वाटत नाही.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली.

जागेचे भाव वधारणार?
शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणारे आरटीओ कार्यालय कवलापुरात येणार असल्याने बुधगाव आणि कवलापूर येथील ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता रोजगार तसेच व्यवसाय करण्याची संधी मिळेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. याठिकाणी वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, दंत महाविद्यालय आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात येथील जागेला सोन्याचा दर आला आहे. भविष्यात याठिकाणी आणखी एक अभियांत्रिकी महाविद्यालय होणार असल्याने लोकांनी जागेमध्ये पैसे गुंतविले आहेत. आता आरटीओ कार्यालय होणार असल्याने येथे व्यवसाय करण्यासाठी जागेचे भाव वधारणार आहेत.


आरटीओ कार्यालय कसे असेल?
४सुसज्ज प्रशासकीय इमारत
४नागरिकांसाठी प्रतीक्षा सभागृह
४वाहन चालकांसाठी प्रशिक्षण सेंटर
४अत्याधुनिक वाहन परवाना परीक्षा सेंटर
४चारशे मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक
४मेकॅनिकल फिटनेस सेंटर
४अधिकाऱ्यांसाठी विश्रांतीगृह
४कारवाई केलेली वाहने ठेवण्याचे गोदाम

Web Title: RTO office will be held at Kavalapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.