आरटीओ कार्यालय हक्काच्या जागेत नेणार
By Admin | Published: January 8, 2015 11:20 PM2015-01-08T23:20:24+5:302015-01-09T00:14:22+5:30
दशरथ वाघोले यांचा संकल्प
सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी (आरटीओ) दशरथ वाघोले यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. औरंगाबाद, मध्य मुंबई, ठाणे, गोंदिया आणि आता सांगली असा त्यांच्या सेवेचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. सांगलीला पहिल्यांदाच अत्यंत तरुण आरटीओ लाभला आहे. त्यांची कामाची पद्धत, कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणारे हे कार्यालय अजूनही भाड्याच्या जागेत आहे, याविषयी ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
थेट संवाद
प्रश्न : दोन दिवसात तुम्हाला कार्यालयात प्रामुख्याने कोणती गैरसोय दिसून आली?
उत्तर : सांगली जिल्ह्यात प्रथमच आलो आहे. मी मूळचा पुण्याचा असल्याने मला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बारीक-सारीक विषयांची माहिती आहे. त्यामुळे येथे काम करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणारा हा विभाग आहे. दररोज विविध कामांसाठी शेकडो लोक येतात. सांगलीचे कार्यालय पाहिले, तर लोकांसाठी खूपच गैरसोयीचे आहे. अनेक विभाग सावळी कार्यालयात आहेत. एखादे काम घेऊन लोकांना यायचे म्हटले, तर त्यांचा संपूर्ण दिवस जातो. यामध्ये बदल करण्यासाठी कार्यालयास हक्काची जागा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रथमप्राधान्य दिले जाईल. तत्कालीन आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांनीही जागेसाठी खूप प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या विषयात त्यांचीही मदत घेतली जाईल. येत्या सहा महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल.
प्रश्न : तुमच्या कामाची पद्धत कशी असेल?
उत्तर : प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. माझीही पद्धत कृतीतून दिसून येईलच. ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न फार गंभीर आहे. यावर कारवाई होते, मात्र ती पुरेशी ठरत नाही. जिल्ह्याच्या सीमाभागातून सांगलीत ओव्हरलोड वाहतूक होते. ती रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले जाईल. गरज वाटल्यास मीही कारवाईसाठी रस्त्यावर उतरेन. प्रवासी वाहतुकीस विरोध नाही. मात्र क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक चालू देणार नाही. तसे आढळून आल्यास वाहन जप्त केले जाईल. या कारवाईसाठी विशेष पथक नियुक्त केले जाईल.
प्रश्न : पोलिसांच्या काही मोहिमांमुळे अपघातांना आळा बसला आहे. तुमच्याकडे काही कल्पना आहेत का?
उत्तर : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण अपवाद वगळता रस्त्यांची लांबी-रुंदी तेवढीच आहे. अपघात होणाऱ्या नवीन व जुन्या ठिकाणांचा अभ्यास केला जाईल. याठिकाणी गतिरोधक बसविले जातील. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांप्रमाणे आमचीही स्वतंत्र मोहीम सुरू केली जाईल. त्याची सुरुवात सांगलीतून केली जाईल. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल.
प्रश्न : रस्ता सुरक्षा पंधरवडा पुढील आठवड्यात आहे. यामध्ये नवीन काय राबविणार आहात?
उत्तर : रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून देण्यावर भर असेल. वाहतूक नियमांचे धडे शाळेतूनच मिळाले तर, भविष्यात त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. पाचवी ते सातवी व आठवी, दहावी अशा दोन मोठ्या गटात चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन याविषयी मोठ्या महाविद्यालयांत व्याख्याने आयोजित केली आहेत.
प्रश्न : एजंटांकडून फाईल आल्याशिवाय कार्यालयातील कर्मचारी काम करीत नाहीत, असा सातत्याने का आरोप होतो?
उत्तर : आरटीओ कार्यालयाबाहेर एजंट आहेत का अन्य कोणी, हे समजत नाही. त्यांच्याशी आमचा काहीही संबंध येत नाही. नागरिकांनी त्यांची कामे स्वत: घेऊन यावीत. ती पूर्ण केली जातील. अधिकारी व कर्मचारी दाद देत नसतील तर, थेट माझ्याशी संपर्क साधावा. कोणतेही काम असो, ते पूर्ण कसे करायचे, अर्ज कसा भरायचा, याची नागरिकांना त्वरित माहिती मिळावी, याची लवकरच सोय केली जाईल. नागरिकांची कार्यालयाविषयी कुठेही तक्रार राहणार नाही, याची खबरदारी घेऊन काम केले जाईल.
- सचिन लाड