शिक्षण सेवकांचा हंगामा

By admin | Published: August 1, 2016 12:21 AM2016-08-01T00:21:14+5:302016-08-01T00:21:14+5:30

सोसायटी सभेत प्रचंड गदारोळ : धक्काबुक्की; सभेनंतर खुर्च्या भिरकावल्या

The ruckus of the teaching staff | शिक्षण सेवकांचा हंगामा

शिक्षण सेवकांचा हंगामा

Next

सांगली : शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची रविवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळ, गदारोळात पार पडली. सभेत विषय मांडल्यानंतर वारंवार सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर येत होते. त्यामुळे सभेत तणाव निर्माण झाला होता. व्यासपीठासमोर येऊन आपले म्हणणे मांडणाऱ्यांमध्ये माईकचा ताबा घेण्यावरून जोरदार धक्काबुक्की झाली. यानंतरही प्रत्येक विषयावर गोंधळ वाढतच चालल्याने, अशा वातावरणातच सभा पार पडली. सभेनंतर सभासदांनी खुर्च्या फेकल्या, टेबलही उधळले.
शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंगच्या हॉलमध्ये झाली. सोसायटीच्या अध्यक्षा सुलभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सभेत सुरूवातीपासूनच गोंधळाची स्थिती होती.
माईकवरून आपले म्हणणे मांडण्यावरून आणि एका सभासदाने आव्हान दिल्याने सभागृहात प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. माईकचा ताबा घेण्यावरून दोन्ही गट आमने-सामने आल्याने धक्काबुक्की झाली. व्यासपीठासमोरील गर्दी वाढतच चालल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सभेत सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याची मागणी महावीर सौंदत्ते यांनी केली. यावर लाभांशात वाढ झालीच पाहिजे, या मागणीवर सभासदांनी सभागृह डोक्यावर घेतले. जवळपास अर्धा तास सभासद व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत या मागणीची घोषणा देत होते. यावेळी दोन्ही गटाचे सभासद व्यासपीठावर जाऊनही आपले म्हणणे मांडत होते. त्यामुळे गोंधळात वाढच झाली. अखेर अध्यक्षांनी हस्तक्षेप करीत, साडेबारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. तरीही सभासदांचे समाधान झाले नाही. मागणी मान्य न झाल्यास समांतर सभा घेण्याचा इशारा विरोधकांनी यावेळी दिला. अखेर अध्यक्षांनी १३ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
लाभांशाच्या मागणीवरून तणाव निर्माण झाला असतानाच, संचालक रवींद्र गवळी सत्ताधारी गटाचे म्हणणे मांडत असताना विरोधी गटाचे संचालक तानाजी पवार यांनी त्यांना विरोध करत, यावर अध्यक्षांनीच म्हणणे मांडावे, अशी मागणी केल्याने व्यासपीठावरच हमरीतुमरी सुरू झा ली.
अहवाल वाचनावेळी वैधानिक लेखापरीक्षणाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी व लेखापरीक्षकांनी त्यात घेतलेल्या आक्षेपावर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या विषयावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी सभासदांनी मंजूर-मंजूरच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. दोन तासानंतरही सभा सुरूच राहिल्याने मंजुरीच्या घोषणा देत सभा संपविण्यात आली.
आटपाडी शाखेच्या जागा खरेदीवरील विषयावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजुरीच्या जोरदार घोषणा देत सभा संपविली. यावर विरोधकांनी समांतर सभा घेत, सत्ताधारी गटाच्या गैरकारभारावर टीकास्त्र सोडले. सभेची कागदपत्रे घेऊन अधिकारी जात असताना विरोधकांनी याला विरोध केला. त्यानंतर खुर्च्या फेकून देत टेबलेही पाडण्यात आली. शिक्षण सेवक सोसायटीची सभा आतापर्यंत शांततापूर्ण वातावरणात होत असताना पहिल्यांदाच जोरदार गोंधळ पाहावयास मिळाला. यावेळी राजाराम पाटील, संदीप पाटील, संताजी घाडगे, रवींद्र गवळी, दीपक गायकवाड, चंद्रकांत जाधव, राजेंद्र खांडेकर आदी संचालक उपस्थित होते.
१३ टक्के लाभांशाच्या मागणीवर विरोधक ठाम
१२ टक्के लाभांशाची घोषणा केल्यानंतर माजी संचालक सौंदत्ते यांनी १३ टक्के लाभांश देण्याची मागणी केली. यावर जोरदार गदारोळ झाल्यानंतर अखेर ही मागणी मान्य करण्यात आली. लाभांश देताना तो समकरण निधीतून देण्याची मागणी विरोधकांनी करताच, यामुळे संस्था तोट्यात येईल, असे म्हणणे अध्यक्षांनी मांडले. यावर कवठेमहांकाळ शाखेतील फर्निचर, शाखेसाठीच्या जागेचा व्यवहार, बांधकामावर मोठा खर्च करताना हित आठवत नाही का? असा सवाल करीत विरोधक मागणीवर ठाम राहिले.
विरोधकांची समांतर सभा
सत्ताधारी गटाकडून मंजूर... मंजूर... अशा घोषणा देत सभा संपविण्यात आल्यानंतर विरोधकांनी समांतर सभा घेतली. यात आटपाडी येथील शाखेसाठीच्या जागा खरेदीची चौकशी करावी, निकष डावलून करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या निवडी रद्द करा, पेठभाग शाखेतील खर्चाची चौकशी करा, कवठेमहांकाळ शाखेतील फर्निचरच्या कामाची चौकशी करा असे ठराव केले. यावेळी महावीर सौंदत्ते, सुधाकर माने, रघुनाथ सातपुते, राजेंद्र नागरगोजे आदी उपस्थित होते.
सभा उधळण्याचा विरोधकांचा डाव
सोसायटीचे कामकाज सुरळीतपणे सुरू असताना, आजची सभा उधळून लावायची, या उद्देशानेच विरोधक आले होते. हा त्यांचा पूर्वनियोजित डाव होता. मात्र, तरीही सभा सुरळीत पार पडली. पदाधिकारी निवडीतील रागामुळेच विरोधकांनी असे केले असून, शिक्षणाशी संबंधित असलेल्या संस्थेची सभा शांततेत होणे आवश्यक होते, असे सोसायटीच्या अध्यक्षा सुलभा पाटील यांनी सभेनंतर सांगितले.

Web Title: The ruckus of the teaching staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.