माजी उपनगराध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम
By Admin | Published: October 30, 2016 11:38 PM2016-10-30T23:38:40+5:302016-10-30T23:38:40+5:30
इस्लामपूर पालिका : दोघे विकास आघाडीत
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात बरीच खळबळ माजली आहे. उमेदवार निवडीवेळी काहींना बेदखल करण्यात आले. या नाराजीचा विस्फोट म्हणून माजी उपनगराध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांचे समर्थक मुकुंद कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकत विकास आघाडीत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी समर्थक सुरेश हवलदार यांच्या पत्नीस प्रभाग ८ ब मधून विकास आघाडीची उमेदवारी बहाल करण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी, राष्ट्रवादीमधील कुरघोडीचे राजकारण व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून विकास आघाडीत प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील, विक्रम पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, बाबा सूर्यवंशी, विजय कुंभार उपस्थित होते.
मंत्री खोत यांनी मुकुंद कांबळे यांचे विकास आघाडीत स्वागत केले. ते म्हणाले, मुकुंद कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांना विकास आघाडीत सन्मानाची वागणूक मिळेल. निशिकांत पाटील म्हणाले, मुकुंद कांबळे यांना सर्वतोपरी मदत करू. त्यांना कसलीही अडचण येऊ देणार नाही. ते आमच्या परिवारातील आहेत. त्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊ. (वार्ताहर)