सांगलीतील कुरळपमध्ये यात्रेच्या मानावरून सत्ताधारी-विरोधकात तणाव, गावात पोलिस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:55 PM2023-03-24T12:55:39+5:302023-03-24T12:56:03+5:30
६ एप्रिलरोजी हनुमान यात्रा होणार
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेत मानपानावरून राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील व ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गट आमने-सामने आले. गावात तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कुरळप येथे ६ एप्रिलरोजी हनुमान यात्रा होणार आहे. तिच्या आयोजनाबाबत बुधवारी हनुमान मंदिरात दोन्ही गटांनी एकाच वेळी बैठक बोलावल्याने तणाव निर्माण झाला. यात्रेचा मान आमचाच आहे, असा आग्रह पी. आर. पाटील यांनी धरला. सत्ताधारी गटाने आपली सत्ता असल्याने यात्रेचा अधिकार आपल्याचाच असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला.
याबाबत माहिती मिळाल्यावर इस्लामपूर ठाण्याच्या पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मा कदम यांनी गावात दाखल होत दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
सत्ताधारी गटाने यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अशोक पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी मारुती जाधव यांची निवड केली. यावेळी सत्ताधारी गटाकडून अशोक पाटील यांच्याहस्ते, तर विरोधी गटाकडून पी. आर. पाटील यांच्या हस्ते वेगवेगळा पूजनाचा विधी झाला.
कारवाई करणार
दोन्ही गटांनी गावाची शांतता व सलोखा कायम टिकवण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवा होता. चुकीच्या घटना घडल्यास कारवाई केली जाईल, असे कुरळपचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.
पी. आर. पाटील यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचा लेखाजोखा ग्रामस्थांच्या समोर येत आहे. त्यातून ते आपली प्रतिमा सोज्वळ ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यात्रेला गालबोट लागल्यास त्याला सर्वस्वी पी. आर. पाटील हे जबाबदार राहतील. - अशोक पाटील, अध्यक्ष, यात्रा कमिटी
ग्रामदैवतेच्या यात्रेचा मान आमचाच आहे. सत्ताधारी गट एका विजयाने उन्मत झाला आहे. गावामध्ये बाहेरचा भटजी आणून सत्ताधारी गटाने चुकीचा पायंडा पाडला आहे. हनुमानाचे मंदिर कोट्यवधी रूपये खर्च करून आम्हीच बांधले. यामुळे देवळात बसण्याचा नैतिक अधिकार आम्हालाच आहे.- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राज्य सहकार संघ