विट्यात सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी!
By admin | Published: July 19, 2014 11:08 PM2014-07-19T23:08:43+5:302014-07-19T23:24:08+5:30
नगराध्यक्ष निवडणूक : नंदकुमार पाटील विरुध्द कृष्णत गायकवाड
विटा : विटा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आ. सदाशिवराव पाटील समर्थक नंदकुमार पाटील व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू नगरसेवक कृष्णत गायकवाड यांच्यात लढत होत आहे. गायकवाड यांनी आज (शनिवारी) अर्ज मागे न घेतल्याने पालिकेत नगराध्यक्ष निवडीच्या माध्यमातून सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी असा संघर्ष पहायला मिळणार आहे. नगराध्यक्षाची निवडणूक येत्या सोमवारी (दि. २१) होत आहे.
पालिकेत आ. पाटील यांचे एकेकाळचे विरोधक अशोकराव गायकवाड यांनी पालिका निवडणुकीत आ. पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवून २३ पैकी २० जागा पदरात पाडून घेऊन पालिकेत एकहाती सत्ता मिळविली. आ. पाटील गटाला १५, तर गायकवाड गटाला पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र, गेल्या एक-दोन महिन्यांपासून पालिका सभागृहात आ. पाटील व गायकवाड समर्थक सत्ताधारी गटातच धुसफूस सुरू आहे.
आ. पाटील यांनी गायकवाड गटाला नगराध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. त्यापूर्वी नंदकुमार पाटील यांनाही नगराध्यक्ष पदावर संधी देण्याबाबत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या साक्षीने चर्चा झाली होती. त्यामुळे आता रिक्त होणाऱ्या नगराध्यक्षपदावर नंदकुमार पाटील यांची निवड करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला. त्यामुळे गायकवाड समर्थक गटाने कृष्णत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध नगराध्यक्ष निवडीला सुरूंग लावला.
विटा नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटातून नंदकुमार पाटील, सुभाष पाटील व गायकवाड समर्थक गटातून कृष्णत गायकवाड या तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिमदिवशी सुभाष पाटील यांनी अर्ज मागे घेतला. गायकवाड समर्थक कृष्णत गायकवाड अर्ज मागे घेतील, अशी चर्चा होती. त्यासाठी पालकमंत्री डॉ. कदम यांनीही मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. परंतु, गायकवाड यांनी अर्ज मागे न घेतल्याने विट्यात नगराध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी असा सामना रंगणार आहे. (वार्ताहर)