आष्ट्यात घरकुलाच्या जागेवरून सत्ताधारी बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:14+5:302021-03-27T04:27:14+5:30
सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा-तासगाव मार्गावरील फिल्टर हाऊससमोरील आष्टा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या नावावर म्हाडाची घरकुलासाठी ...
सुरेंद्र शिराळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा-तासगाव मार्गावरील फिल्टर हाऊससमोरील आष्टा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या नावावर म्हाडाची घरकुलासाठी राखीव असलेली सहा एकर सहा गुंठे जागा पुन्हा शासनाच्या नावावर झाली आहे. यामुळे आष्टा शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाऐवजी महाराष्ट्र शासनाचे नाव लागल्याचा सातबारा सादर केल्याने सत्ताधारी गट बॅकफूटवर गेला आहे.
आष्टा शहरात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल योजना राबविण्यात आली. मात्र उर्वरित २ हजार ४५ बेघर नागरिकांनी घरकुलाची मागणी केली आहे. गुरुवारी पालिकेच्या सभेत शहरातील बेघरांना म्हाडाच्या जागेवर घरकुल बांधून देण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करण्याचा विषय आल्यानंतर विरोधी पक्षनेते वीर पुतळे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नावावरील घरकुलाची जागाच जिल्हाधिकाऱ्यांनी काढून घेतल्याचे सांगितल्याने सत्ताधारी गट हतबल झाला.
ही २.४६ हेक्टर आर जमीन मुख्याधिकाऱ्यांच्या नावे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी विनामूल्य काही अटीवर देण्यात आली होती. या जमिनीचा पालिकेने दिलेल्या कारणासाठी वापर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी २ मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांचे नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल केले आहे असे कुदळे यांनी सांगितले. जागाच नसल्याने घरकुल योजना कोठे होणार? असा सवालही त्यांनी केला.
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांचे संबंधित जागा मागणीचे पत्र आल्याची माहिती नगराध्यक्ष स्नेहा माळी व गटनेते विशाल शिंदे यांना दिल्याचे सांगितले. यावेळी वीर कुदळे,अर्जुन माने यांनी मुख्याधिकारी यांनी सर्व नगरसेवकांना याबाबत का कल्पना दिली नाही, अशी विचारणा केली. यावेळी सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी पालिकेची या विषयावर विशेष सभा बोलावून लवकरच एक मताने विरोध करण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.
चाैकट
आर्थिक व्यवहाराचा आरोप
वीर कुदळे यांनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांच्या व मुख्याधिकारी यांनी संगनमत करून घरकुलासाठी राखीव असलेली जागा गॅस एजन्सीच्या ठेकेदाराला पोसण्यासाठी हस्तांतरित केल्याचा व आर्थिक व्यवहाराचा आरोप केल्याने सध्या सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत.