मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजपला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:48 AM2021-02-18T04:48:20+5:302021-02-18T04:48:20+5:30

मिरज : मिरज पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली. दोन महिला सदस्यांच्या ...

Ruling BJP in Miraj Panchayat Samiti | मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजपला धक्का

मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजपला धक्का

Next

मिरज : मिरज पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली. दोन महिला सदस्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे कवठेपिरानचे सदस्य अनिल आमटवणे यांनी सत्ताधारी भाजपचे सदस्य किरण बंडगर यांचा ११ विरुध्द १० मतांनी पराभव करत भाजपला जोरदार धक्का दिला. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपअंतर्गत निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उपसभापती निवडीवर उमटल्याचे स्पष्ट झाले.

उपसभापतींची निवड बुधवारी पार पडली. निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपबरोबर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या मित्रपक्षांत राजकीय खलबते सुरू होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांनी असहकार्य केल्याचे उट्टे मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत व आरगचे एस. आर. पाटील यांनी काढले. सावंत यांच्या पत्नी शुभांगी सावंत व पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या दोन महिला सदस्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात बंड करीत निवडीत काँग्रेसला पाठिंबा दिला.

उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीतर्फे अनिल आमटवणे, सतीश कोरे व सत्ताधारी भाजपकडून किरण बंडगर यांंनी अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपचे १२, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना ९ अशी सदस्यसंख्या आहे. कोरे यांनी माघार घेतल्याने किरण बंडगर व अनिल आमटवणे यांच्यात लढत झाली. या लढतीत काँग्रेसचे अनिल आमटवणे यांना भाजपच्या दोन महिला सदस्यांच्या पाठिंब्याने ११, तर भाजपचे किरण बंडगर यांना १० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी उपसभापतीपदी अनिल आमटवणे यांच्या निवडीची घोषणा केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी काम पाहिले.

चौकट

भाजपविरोधात जिंकण्यासाठी लढलो

सहकार्य केल्याच्या बदल्यात विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत संधी देण्याचे भाजप नेत्यांनी आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले नाही. पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील, जयश्रीताई पाटील या नेत्यांनी भाजपविरोधात लढण्याचे बळ दिल्याने आपण जिंकलो. भाजपच्या सदस्या शुभांगी सावंत, सुनीता पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहिते यांनी दिलेला पाठिंबा व काँग्रेस सदस्यांच्या ऎक्यामुळे पदावर निवड झाल्याचे नूतन उपसभापती अनिल आमटवणे यांनी सांगितले.

चौकट

विश्वासघातकी राजकारणामुळे पराभव

पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. प्रत्येक निवडीत आपण थांबून पक्षातील इतरांना संधी मिळावी यासाठी सहकार्य केले. ज्यांना सभापतीपद मिळावे यासाठी मदत केली, त्यांनी ऎनवेळी पक्षाच्याविरोधात जाऊन काँग्रेसला सहकार्य केले. त्यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे पराभव झाला, अशी प्रतिक्रिया किरण बंडगर व नेते विक्रम पाटील यांनी पराभवानंतर दिली.

Web Title: Ruling BJP in Miraj Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.