महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसला दणका
By admin | Published: June 23, 2016 12:36 AM2016-06-23T00:36:48+5:302016-06-23T01:09:37+5:30
राष्ट्रवादीला सभापतिपद : मागासवर्गीय समितीत स्नेहल सावंत यांची बाजी; मते फुटली
सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय समिती सभापती निवडीत महापौर व उपमहापौर गटाला बुधवारी बंडखोरांनी दणका दिला. सत्ताधारी काँग्रेसच्या मदनभाऊ तथा महापौर गटातील एक, तर विशाल पाटील तथा उपमहापौर गटातील दोन मते फुटल्याने विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल सावंत यांनी पुन्हा एकदा सभापतिपदी बाजी मारली. सावंत यांना सहा, तर काँग्रेसच्या शेवंता वाघमारे यांना पाच मते मिळाली. ऐनवेळी विशाल पाटील गटाच्या सुरेखा कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. या निवडीनंतर सावंत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
मागासवर्गीय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापतिपदासाठी काँग्रेसमधील मदनभाऊ गटाकडून शेवंता वाघमारे, तर विशाल पाटील गटाकडून सुरेखा कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. उपमहापौर गटाच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मंगळवारी सायंकाळपासून काँग्रेसमधील दोन्ही गटाने संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यासाठी सदस्यांच्या गाठीभेटीही घेण्यात आल्या. सकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. समितीत मदनभाऊ गटाचे तीन, उपमहापौर गटाचे पाच, तर राष्ट्रवादीचे तीन असे संख्याबळ आहे.
बुधवारी सकाळी साडेअकराला समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत विशाल पाटील गटाच्या सुरेखा कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कॉँग्रेसच्या शेवंता वाघमारे व राष्ट्रवादीच्या स्नेहल सावंत यांच्यात सरळ लढत झाली. दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने जिल्हाधिकारी गायकवाड यांनी हात उंचावून मतदान घेतले.
यावेळी मदनभाऊ गटाचे माजी महापौर विवेक कांबळे व उपमहापौर गटातील बाळासाहेब गोंधळी (स्वाभिमानी आघाडी) व शुभांगी देवमाने (राष्ट्रवादी) यांनी सावंत यांना मतदान केले. यामुळे सावंत यांना सहा, तर वाघमारे यांना पाच मते मिळाली. जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या हस्ते स्नेहल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत दोन्ही गटाला धक्का बसला.
मदनभाऊंच्या अपमानाचा बदला
गेल्यावर्षी मागासवर्गीय सभापती निवडीत दिवंगत मदनभाऊंनी बाळासाहेब गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा काँग्रेसच्याच सदस्यांनी गोंधळी यांना मतदान न करता त्यांचा पराभव केला. आता तेच सदस्य रिंगणात असल्याने आपण त्यांना मतदान केले नाही.
मदनभाऊंना त्रास दिलेल्यांचा बदला घेतला. मी एकटाच त्यांचा खऱ्याअर्थाने समर्थक आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिली, तर ‘स्वाभिमानी’चे नेते गौतम पवार यांनीही गोंधळी यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
पवार म्हणाले की, गतवेळी मदनभाऊंशी चर्चा करून गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. आताच्या काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी तेव्हा गोंधळींना मतदान केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत गोंधळी यांना मतदानाची मुभा दिली होती. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. ज्यांना मतदान केले, तो गटही राष्ट्रवादीत नाराज आहे.
शुभांगी देवमाने राष्ट्रवादीच्या नगरसेविका असल्या तरी, सध्या त्या उपमहापौर गटात असल्याचा दावा केला जातो.
त्यांनी या गटाच्या उमेदवारांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली होती. प्रत्यक्षात निवडीवेळी देवमाने यांनी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.