कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

By संतोष भिसे | Published: September 17, 2022 02:19 PM2022-09-17T14:19:53+5:302022-09-17T14:20:27+5:30

कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता.

Rumors on social media of lumpy infection in hen, the animal husbandry department has revealed the truth | कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

googlenewsNext

सांगली : पोल्ट्रीमधील कोंबड्यांनाही लम्पीची लागण होत असल्याच्या अफवा पसरु लागल्या आहेत, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. पण गाई-म्हैशींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पशुपक्ष्याला लम्पीची लागण होत नसल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

राज्यात लम्पीचा फैलाव हळूहळू वाढत आहे. सांगली जिल्ह्यातही रोगग्रस्त जनावरांची संख्या वाढत आहे. या स्थितीत अफवांचेही पीक आले आहे. माणसांनाही लम्पीचा संसर्ग होतो, लम्पीग्रस्त जनावराचे दूध पिऊ नये अशी माहिती समाजमाध्यमांवर पसरत आहे. अर्थात, त्याला कोणताही आधार नाही. माणसांना संसर्ग होणे किंवा लम्पीग्रस्त जनावराचे दूध बाधक असणे ही माहिती पशुसंवर्धन विभागाने स्पष्टपणे नाकारली आहे. शिवाय, राज्यात कोठेही माणसाला संसर्ग झाल्याचे उदाहरण नाही. किंबहुना माणसाला त्याची लागण होतच नाही असा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे.

या स्थितीत अफवाखोरांनी पोल्ट्रीतील कोंबड्यांना लक्ष्य केले आहे. कोंबड्यांनाही लम्पीची लागण होत असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यासाठी काही कोंबड्यांची छायाचित्रेही पसरवली जात आहेत. त्यांच्या अंगावर गाठी दिसत आहेत. या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या दणक्यातून सावरलेल्या पोल्ट्री व्यवसायात स्थिरता येत असताना आता लम्पीच्या अफवेचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता.
 
ही तर देवी!

कोंबड्यांच्या त्वचेवर किंवा मांसावर दिसणाऱ्या गाठी म्हणजे देवी आजार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. हा जुनाच आजार असून त्यावर लसही उपलब्ध आहे. वाढीच्या अवस्थेतच लस टोचल्यास देवी उदभवत नाही. शिवाय देवी झाल्यावरही  औषध लावल्यास  रोगाचे निर्मूलन होते.


कोंबड्यांना लम्पी आजार होत नाही. किंबहुना गाय आणि म्हैशीव्यतिरिक्त अन्य कोणताही पशुपक्षी किंवा माणसांना लम्पीचा संसर्ग होत नाही. म्हैशीमध्ये लागण होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे कोंबड्यांविषयी गैरसमज अजिबात बाळगू नये. - डॉ. बी. डी. कदम, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

Web Title: Rumors on social media of lumpy infection in hen, the animal husbandry department has revealed the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली