पळा, पळा, पॅसेंजर चौथ्या फलाटावर आलीय! रेल्वेसाठी धावताना प्रवाशांना फुटला घाम
By संतोष भिसे | Published: August 11, 2023 08:51 PM2023-08-11T20:51:26+5:302023-08-11T20:51:45+5:30
मिरज रेल्वे स्थानकातील प्रशासनाच्या अनागोंदीमुळे महिला, वृद्धांची ससेहोलपट झाली.
सांगली : सकाळी साडेआठ वाजताची सातारा -कोल्हापूर पॅसेंजर वर्षानुवर्षे फलाट क्रमांक एकवर येते. सातारा, सांगली जिल्ह्यातून नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापूरला जाणारे हजारो प्रवासी पहिल्या फलाटावरच थांबतात. पण शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांना काय हुक्की आली कोणास ठाऊक? गाडी थेट चौथ्या फलाटावर नेऊन उभी केली. ती पकडण्यासाठी धावाधाव करताना शेकडो प्रवाशांना घामच फुटला.
मिरज रेल्वे स्थानकातील प्रशासनाच्या अनागोंदीमुळे महिला, वृद्धांची ससेहोलपट झाली. प्रवासी पहिल्या फलाटावर गाडीकडे डोळे लावून थांबले होते, तितक्यात ती चौथ्या फलाटावर शिरत अल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रचंड पळापळ झाली. रुळावरुन वाटेल तशा माकडउड्या मारत प्रवासी पॅसेंजरकडे धावले. ज्यांना उड्या मारणे जमले नाही, त्यांना भल्यामोठ्या जिन्यावरुन धावपळ करावी लागली. इतका गोंधळ सुरु होता, तरीही अधिकाऱ्यांना भान नव्हते. गाडी चक्क तिसऱ्या फलाटावर थांबल्याची चुकीची उद्घोषणा सुरु होती. वास्तविक सारेच फलाट रिकामे होते, तरीही चौथा फलाट त्यांना दिसला नसावा. संतप्त प्रवाशांनी गाडीजवळ पोहोचल्यावर चालक, गार्डला लाखोली वाहिली.
व्हिलचेअरवरुन प्रवाशाने ओलांडला फलाट
या प्रचंड धांदलीत व्हिलचेअरवरील एका प्रवाशाचे हाल न पाहवणारे होते. त्याची सहकारी महिला व्हिलचेअर ढकलत होती. नंतर त्याला हात देऊन तिने फलाटावरुन रुळांवर उतरवले. दुसऱ्या बाजुला पुन्हा उचलून घेतले. अशीच कसरत करत दोन आणि तीन क्रमांकाचे फलाट ओलांडून पॅसेंजर गाठली.