डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

By संतोष भिसे | Published: October 14, 2022 05:44 PM2022-10-14T17:44:48+5:302022-10-14T17:45:54+5:30

शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आर्थिक कोंडी

Rupee at lows against dollar, Foreign education is expensive | डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

Next

सांगली : जुलै महिन्यापासून डॉलरची किंमत सतत वधारत असल्याने परदेशी शिक्षण महागले आहे. युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. विमानप्रवासासह तेथील घरभाडे आणि खानपानाचीही भरमसाट दरवाढ झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया निचांकी पातळीवर घसरला आहे. शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. डॉलर वधारल्याने युक्रेनचे विमानभाडेही दुप्पटीपर्यंत वाढले आहे. नोव्हेंबरपर्यंतचे विमानांचे बुकींग फुल्ल झाले आहे. मुंबईतून बोल्गेव्हचे विमानभाडे सरासरी ५० ते ६० हजार रुपयांवर पोहोचले आहे. पोलंड, रुमानिया यांचेही प्रवासभाडे वाढले आहे. युक्रेनमध्ये थेट प्रवासी विमानसेवा बंद आहे, त्यामुळे शेजारच्या देशांपर्यंत विमानाने जाऊन युक्रेनमध्ये रस्त्याने प्रवेश करावा लागतो. यामुळेही खर्चात वाढ झाली आहे.

अमेरीका, ब्रिटनसह काही देशांत विद्यार्थी पार्टटाईम नोकऱ्या करुन शिक्षणाचा खर्च भागवतात. पण सध्या नोकऱ्याही दुर्मिळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एकेका नोकरीसाठी दहाजणांचे अर्ज येत आहेत. गतवर्षी एका अमेरीकन विद्यापीठाचे शुल्क १ लाख ४० हजार रुपये होते. डॉलर वधारल्याने ते १ लाख ७५ हजारांवर पोहोचले आहे. काही शिक्षणक्रमांसाठी शिष्यवृत्त्या मिळतात, त्यानंतरही विद्यापीठातील वार्षिक शिक्षणखर्च ७० ते ८० लाखांपर्यंत होत आहे.
कॅनडा, अमेरीका, इंग्लंडसह काही आशियाई देशांत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना डॉलरच्या महागाईचा सामना करावा लागत आहे. 

एप्रिलपूर्वीच्या शैक्षणिक सत्राचे शुल्क ७५ रुपयांना एक डॉलर याप्रमाणे भरले होते, सध्या दुसऱ्या सत्राचे शुल्क ८२ रुपयांनुसार भरावे लागत आहे.
युक्रेनमध्ये युद्धस्थिती कायम असली, तरी तिची झळ सीमाभागातच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनला परतू लागले आहेत. त्यांना अतिरिक्त पैसे मोजून वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागेल.

घरभाडे, मेस झाली महाग

युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासूनच घरांचे भाडे महाग होऊ लागले होते. भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना आता परतीचे वेध लागले आहेत, त्यांना सदनिकांच्या वाढलेल्या भाड्याचा सामना करावा लागेल. खाण्यापिण्याचे पदार्थही महाग झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

रुपयाच्या तुलनेत डॉलर असा फुगला
जानेवारी - ७४.५१
फेब्रुवारी - ७४.७६
मार्च - ७५.७८
एप्रिल - ७५.९५
मे - ७६.५२
जून - ७७.५८
जुलै - ७८.९५
ऑगस्ट - ७८.९५
१ सप्टेंबर - ७९.५५
२३ सप्टेंबर - ८१.२५
३० सप्टेंबर - ८१.८०
ऑक्टोबर - ८२.१७

Web Title: Rupee at lows against dollar, Foreign education is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.