ज्वारीचे उत्पादन घटल्याने भाकरीस महागाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:57 AM2019-05-28T11:57:22+5:302019-05-28T11:58:32+5:30
मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
जत : मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
प्रतिकिलो २२ ते २५ रुपयांना मिळणारी ज्वारी आता ३२ ते ३५ रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे लोकांनी ज्वारीपेक्षा गव्हाला पसंती दिली आहे. ग्रामीण भागात भाकरी, दही, चटणी, कांदा ही सकाळची न्याहरी ठरलेली असायची. परंतु ज्वारीचे दर वाढल्यामुळे शेतकरी कुटुंबातील लोकही आता पॅकिंग गहू आट्याची चपाती खाऊ लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी खंडीने पिकायची त्यांच्याकडेही आता ज्वारीचा दुष्काळ पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
बार्शी, लातूर, उस्मानाबाद, मराठवाडा व कर्नाटकातील तिकोटा, बर्डोल, इंडी, चडचण या भागात शाळू, कार ज्वारी, हायब्रीड आदी पिके घेतली जातात. त्यामुळे हायब्रीड प्रतिकिलो १८ रुपये मिळतो. नंद्याळ शाळू २० रुपये किलो असतो. मध्यम शाळू २५ रुपये व बार्शी एक नंबरचा शाळू २८ ते ३० रुपये प्रतिकिलो असतो. परंतु दुष्काळ व पाणी टंचाईमुळे शाळूचा दर आता ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य शेतकरी ही ज्वारी विकत घेऊन खाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांनी पॅकिंग गहू आट्याला पसंती दिली आहे.
मंगळवेढा हे ज्वारीचे आगार, तर उस्मानाबाद ज्वारीला जीआय दर्जा मिळाला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पाऊस नसतानाही ज्वारी पिकाची पेरणी केली. खर्चाचा जुगार खेळला, परंतु पावसाअभावी पेरणी वाया जाऊन कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे.
जत, सांगोला व मंगळवेढा या परिसरात ज्वारीचे पीक चांगले आले, तर येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात घरात शिल्लक असलेली ज्वारी विकत असतो. त्यामुळे त्या काळात ज्वारीचा दर कमी होतो. परंतु यावर्षी पीक नसल्याने शेतकऱ्यांनी घरातील जुना साठा विक्रीस काढला नाही. त्यामुळे सर्वत्र ज्वारीची टंचाई निर्माण होऊन डिसेंबर महिन्यापासून ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे.