दर साठ रुपयांवर : मिरज तालुक्यातील उत्पादकांच्या आशा पल्लवीत
By admin | Published: July 16, 2014 11:35 PM2014-07-16T23:35:42+5:302014-07-16T23:40:35+5:30
कलकत्ता झेंडूला ‘मुंबई’ने सावरले!
प्रवीण जगताप- लिंगनूर
मिरज तालुक्यातील झेंडू उत्पादकांच्या आशा सध्या पल्लवीत झाल्या आहेत. दसरा, दिवाळीच नव्हे, तर बारमाही झेंडू उत्पादन घेणारे उत्पादकही या परिसरात तयार झाले आहेत. सध्या कलकत्ता झेंडूला २४ रुपयांवरून मुंबई मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये किलोला दर मिळू लागल्याने झेंडू उत्पादकांतून समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
मिरज तालुक्यात मिरज पश्चिम भागात अॅरागोल्ड व कलकत्ता या जातीच्या झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्याचा पश्चिम भाग हा संकरित झेंडू उत्पादनाचा बालेकिल्ला आहे. मात्र झेंडू फुलाला मिळणाऱ्या मुंबई मार्केटचा अभ्यास करून मिरज पूर्व भागातही मल्लेवाडी, एरंडोली व आता लिंगनूर येथेही झेंडूचे प्लॉट करून प्रयोगशील व अल्पमुदतीच्या नगदी पिक ांचा प्रयोग येथील प्रयोगशील शेतकरी करू लागले आहेत.
देशी फुलांना बहर एकदाच मोठ्या प्रमाणावर येतो व एकदाच मोठी तोड करता येते. मात्र कलकत्ता व अॅरागोल्ड या संकरित जातीच्या झेंडूला दर पाच दिवसांनी तोड घेणे शक्य होते. तसेच पंचेचाळीस दिवसांनी सुरू झालेली या झेंडूची तोड पुढे दोन ते अडीच महिन्यांपर्यंत सुरू राहते. कलकत्ता झेंडूचे पीक सुमारे ९० ते १२० दिवसांचे आहे. या पिकास २ रुपये ८० पैसेच्या दराने रोपे मिळतात, तर रोप लागवडीसह औषधांचा खर्च एकरी सुमारे साठ हजारांपर्यंत पोहोचतो.
मात्र झेंडूस चाळीस ते पन्नास रुपयांचा दर मिळत राहिल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होऊन चांगले उत्पन्न मिळते. मागील काही दिवसांपासून २४ ते २८ रुपयांवर थबकलेला दर मागील आठवड्यात ४०, तर आता ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. अशात पुन्हा महिन्याभरावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव लक्षात घेता पुन्हा झेंडूचे दर वधारतील अशी आशा आहे.