वाढदिवसाच्या बासुंदीवर ताव, विषबाधेमुळे रुग्णालयात धाव; आटपाडी येथे 8 जणांची प्रकृती बिघडली
By संतोष भिसे | Published: April 28, 2024 04:01 PM2024-04-28T16:01:03+5:302024-04-28T16:03:22+5:30
नितीन सागर यांच्या कुटुंबात शुक्रवारी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये सागर आणि माळी कुटुंबिय सहभागी झाले होते.
आटपाडी : आटपाडी शहरातील मापटे मळा येथील एका घरगुती कार्यक्रमात बासुंदी खाल्ल्याने दोन कुटुंबातील आठजणांचा विषबाधा झाली. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर आटपाडी ग्रामीण रूग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नानासाहेब धोंडीबा सागर, आशा नानासाहेब सागर, नितीन नानासाहेब सागर, राणी नितीन सागर, संस्कार नितीन सागर, छाया गणपती माळी, वैभव गणपती माळी, अमृता वैभव माळी (सर्व रा. मापटे मळा, आटपाडी) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.
नितीन सागर यांच्या कुटुंबात शुक्रवारी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये सागर आणि माळी कुटुंबिय सहभागी झाले होते. रात्री सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यासाठी आटपाडीतील एका बेकरीतून बासुंदी आणली होती. जेवणानंतर सर्वांना त्रास होऊ लागला. मळमळणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार सुरु झाले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अत्यवस्थ प्रकृती असलेल्यांना शनिवारी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. ज्यांनी बासुंदी खाल्ली, त्यांनाच त्रास झाला. अन्य नातेवाईकांना त्रास झाला नसल्याचे सागर कुटुंबियांनी सांगितले.