लोकसभा पूर्वरंग: एस. डी. पाटील : वाळव्याचे आमदार ते सांगलीचे खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:42 PM2024-04-01T13:42:57+5:302024-04-01T13:45:30+5:30
सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, ...
सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, एम.आर.देसाई, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण हे वर्गमित्र होते. १९३९ साली त्यांनी वकिली सुरु केली.१९४५ साली त्यांनी वाळवा तालुका शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्याचं १९४९ मध्ये विभाजन झालं. उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा (सध्याचा सांगली जिल्हा) हे दोन जिल्हे निर्माण झाले. नवीन तयार झालेल्या दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे पहिले अध्यक्ष एस. डी. पाटील हे झाले.
मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डच्या खुर्च्या, टेबलपासून ते सर्व कागदपत्रांची वाटणी झाली. जणू दोन भावांमधील ही वाटणी होती. मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णाकृती अश्वारूढ तैलचित्र होतं. एस. डी. पाटील यांनी हे तैलचित्रही मागितलं. बाळासाहेब देसाई यांनी मोठ्या भावाचं मन दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते तैलचित्र एस. डी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं. राजकीय सत्ता ही प्रजेसाठी, जनतेसाठी राबविणाऱ्या लोककल्याणकारी राजाची प्रेरणा सतत रहावी, यासाठी हे तैलचित्र मुद्दाम मागून घेतलं होतं.
१९५२ साली वाळवा (इस्लामपूर) मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९६२ साली ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. या कारकिर्दीतही चांगले काम केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागात तलाव, सामुदायिक व बुडक्या विहिरी काढण्याचा कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात पायाभूत विकासाची अनेक कामे केली.
लोकल बोर्डाच्या जागेवर जि.प.ची इमारत..
एस. डी. पाटील हे दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांनी लोकल बोर्ड इमारतीसाठी सांगली-मिरज रस्त्यावर जागा खरेदी करून ठेवली होती. त्याच जागेवर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना सध्याच्या जिल्हा परिषदेची प्रशस्त अशी घडीव दगडी इमारत बांधण्याचं काम हाती घेतलं आणि पूर्ण केलं. १९६७ साली लोकसभेला मतदार संघाची पुनर्रचना होऊन ४३-सांगली या नावाने हा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेसने सदाशिव दाजी पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत सदाशिव दाजी पाटील हे २,०४,१८५ मते पडून विजयी झाले. त्यांचे विरोधात बी.डी.पाटील यांना ९५,२९३ मते मिळाली.
लोकसभेला पुन्हा काँग्रेस पक्षाला २८३ जागा मिळाल्या व बहुमत प्राप्त होऊन इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सांगली-आपासाहेब बिरनाळे, मिरज-जी.डी.पाटील, तासगाव-बाबासाहेब पाटील, खानापूर-संपतराव माने, वाळवा-राजारामबापू पाटील, शिराळा-वसंतराव आनंदराव नाईक, आटपाडी-कवठेमहांकाळ- बी.एस.कोरे, जत-शिवरुद्र बामणे हे विधानसभेवर निवडून आले. यावेळी महाराष्ट्रातील २७० जागांपैकी काँग्रेसने २०३ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. मुख्यमंत्री पदासाठी श्री वसंतराव नाईक यांची निवड झाली.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व...
लोकलबोर्ड, जिल्हा परिषद, विधिमंडळ, लोकसभा तसेच वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करणारे एस.डी.पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
- ॲड.बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधीज्ञ, विटा.