भाविकांसह एस. टी.लाही आषाढीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी पन्नास लाखाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:50+5:302021-07-19T04:17:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाली आहे. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एस. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाली आहे. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एस. टी. महामंडळालाही बसला आहे. पंढरपूर यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून सांगली विभागाला २०१९मध्ये ४९ लाख ३९ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. या उत्पन्नावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी सोडावे लागणार आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एस. टी. महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडेफार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एस. टी.ने वारी करतात. एस. टी. महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहेत. त्यामुळे या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४९ लाखांचा फटका एस. टी. महामंडळाला बसला आहे.
बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या? ११३
त्यातून एस. टी.ला उत्पन्न मिळायचे? ४९,००,०००
प्रवासी एस. टी.तून दरवर्षी प्रवास करायचे? २३,०००
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
पंचवीस दिंड्या शहरातून तर जिल्ह्यातून आषाढीला सुमारे चारशेहून अधिक दिंड्या निघतात. १९७०पर्यंत बैलगाड्यांनीशी व नंतर वाहनांसोबत दिंड्या निघू लागल्या. गावोगावचे भक्त एकेकट्याने पायी निघायचे, नंतर सामूहिक स्वरुप येत गेले.
वर्षांहून अधिक जुनी परंपरा सांगलीवाडी येथील रावसाहेब कण्हीरे यांच्या संयोजनाखालील दिंडीला आहे. शंभरहून अधिक वारकऱ्यांचा जथ्था सांगलीवाडीहून आळंदीला ज्येष्ठ वद्य सप्तमीला पोहोचतो व तेथून पंढरपूरला माऊलीच्या भेटीसाठी पायी निघतो.
कोट
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढी वारी रद्द झाल्याने एस. टी.लाही मोठे नुकसान सहन करावे लागले. आषाढीच्या पाच ते सहा दिवसांत जवळपास ५० लाखांचे उत्पन्न जिल्ह्यातून मिळत असे. एस. टी.चे हे नुकसान भरुन न निघणारे आहे.
- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ, सांगली विभाग.
कोट
घरात आजेसासऱ्यांपासून वारीची परंपरा चालत आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरला जाता आले नाही. पंढरीला न जाता आम्ही राहू शकत नाही. वारी हा आमचा श्वास आहे. त्यामुळे हा काळ आमच्यासाठी अस्वस्थ करणारा आहे.
- सरस्वती जाधव, वारकरी
कोट
वारीशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करवत नाही. आता हा कटू अनुभव आम्ही घेत आहोत. कधी पंढरीचे दार भक्तांसाठी खुले होईल आणि दिंड्यांचे प्रस्थान सुरु होईल, याची प्रतीक्षा लागली आहे.
- सुभाष तिवारी-चोपदार, वारकरी