एस. टी.ने शहरे जोडली, गावे मात्र अद्याप नकाशाबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:09+5:302021-07-20T04:19:09+5:30
संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यभरात बहुतांश मार्गांवर एस. टी. धावू लागली तरी ग्रामीण भागात मात्र फेऱ्या ...
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यभरात बहुतांश मार्गांवर एस. टी. धावू लागली तरी ग्रामीण भागात मात्र फेऱ्या सुरु झालेल्या नाहीत. ग्रामस्थांना अजूनही वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.
कोरोनाच्या वेगवेगळ्या स्तरांनुसार एस. टी. सेवा सुरु करण्यास शासनाने सशर्त परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा मुख्यालयापासून तालुक्यांदरम्यान एस. टी. धावू लागली आहे. सांगलीतून सर्व तालुक्यांना प्रत्येक तासाला एस. टी. उपलब्ध आहे. तासगाव, वाळवा, इस्लामपूर, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, शिराळा, आटपाडी, पलूस येथूनही बससेवा सुरु झाली आहे. मात्र, यामध्ये ग्रामीण भागाचा समावेश नाही. या मार्गांवर असणाऱ्या छोट्या गावांना एस. टी. सेवेचा लाभ मिळतो. याचवेळी मुख्य रस्त्यावर नसणाऱ्या गावांना मात्र काळी-पिवळीशिवाय पर्याय नाही. सांगली-मिरजेलगतच्या काही गावांना शहरी बसच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत, पण त्यादेखील अत्यंत मोजक्या आहेत.
बॉक्स
गावाकडे जाण्यासाठी काळी-पिवळीचाच आधार
शहरातून गावाकडे जाण्यासाठी सध्यातरी वडापचाच आधार आहे. वैद्यकीय उपचार किंवा सरकारी कार्यालयातील कामासाठीचा प्रवास वडापने करावा लागत आहे.
बॉक्स
एस. टी.ची धाव दूरवर, पण शहरांपुरतीच
- सध्या सांगलीतून प्रत्येक तालुक्याला तासागणिक एस. टी. आहे, पण ग्रामीण भागाला फायदा नाही.
- सांगलीतून पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांसाठीही गाड्या धावताहेत.
- जत, शिराळ्यासारख्या लांबच्या शहरांना जाता येते, पण जवळच्या सलगरे, हिंगणगावला मात्र गाड्या नाहीत.
पॉईंटर्स
आगारातील एकूण बसेस ७१६
सध्या सुरु असलेल्या बसेस ३८५
सध्या सुरु असलेल्या फेऱ्या ७५०
कोट
खेडेगावांनी काय घो़डे मारलेय?
वैद्यकीय उपचारांसाठी सांगली, मिरजेला जावे लागते, पण एस. टी. नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागतो. प्रसंगी खासगी वाहन भाड्याने घ्यावे लागते. एस. टी.ने काही महत्त्वाच्या व मोठ्या गावांना फेऱ्या सुरु कराव्यात.
- प्रल्हाद माळी, प्रवासी, सलगरे
गावातून सांगलीला एस. टी. सुरु नाही. दुचाकीने विट्याला जातो, तेथून एस. टी.ने सांगली, मिरजेला जातो. संध्याकाळी परततानाही हीच कसरत करावी लागते. एस. टी.ने खेडेगावांसाठी सकाळी व संध्याकाळी किमान एक फेरी सुरु करावी.
- युवराज जाधव, नेवरी
ग्रामीण भागातून प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. एस. टी.ला प्रतिकिलोमीटर ४५ ते ५० रुपये खर्च येतो, सध्याचे उत्पन्न मात्र २२ रुपये आहे. सांगलीतून प्रत्येक तालुक्याला फेऱ्या सुरु आहेत.
- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, सांगली