सांगली : महिनाभर लटकला त्या महिलेचा मृतदेह, नांद्रेतील घटना : सांगाडाच शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:36 PM2019-01-15T16:36:26+5:302019-01-15T16:37:26+5:30
नांद्रे (ता. मिरज) येथील पल्लवी सदाशिव बाणे (वय २९) या बेपत्ता महिलेचे गूढ अखेर सोमवारी उघडले. नांद्रेतील पाचोरे मळ्यात उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तिचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. महिन्यापासून ती बेपत्ता असल्याने केवळ सांगाडाच शिल्लक आहे. साडीवरून तिची ओळख पटली.
सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथील पल्लवी सदाशिव बाणे (वय २९) या बेपत्ता महिलेचे गूढ अखेर सोमवारी उघडले. नांद्रेतील पाचोरे मळ्यात उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तिचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. महिन्यापासून ती बेपत्ता असल्याने केवळ सांगाडाच शिल्लक आहे. साडीवरून तिची ओळख पटली.
बमनाळ (ता. अथणी) हे पल्लवीचे मूळ गाव. पंधरा वर्षांपूर्वी ती उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह नांद्रेत वास्तव्यास आली. पती, सासू व दोन मुलांसमवेत ती संजय बापूसाहेब पाचोरे यांच्या शेतात राहत होती. ११ डिसेंबर २०१८ रोजी ती बेपत्ता झाली होती.
घरच्यांनी तिचा शोध घेतला,पण कुठेच सुगावा लागला नाही. ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी संजय पाचोरे यांच्या शेतात उसाची तोड आली होती. त्यावेळी मजुरांना उसाच्या फडात मध्यभागी मानवी सांगाडा गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले.
सांंगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह साडीने लटकत होता. साडीच्या रंगावरून हा मृतदेह बेपत्ता पल्लवी बाणे हिचा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या घरच्यांनीही तिची साडी ओळखली. विच्छेदन तपासणीसाठी हा सांगाडा मिरज वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे.