Sangli: दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

By अशोक डोंबाळे | Published: May 25, 2024 06:40 PM2024-05-25T18:40:26+5:302024-05-25T18:40:42+5:30

जिल्हा बँकेच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

Sack employees who cheat on drought fund says Sunil Farate  | Sangli: दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

Sangli: दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ बडतर्फची कारवाई झाली पाहिजे, तसेच दोन कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार व ठेवी या बँकेत आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजेच साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक साहाय्य देते, म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते.

जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीकविमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी हा ज्या-त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता, तो अनामत खाती शिल्लक ठेवला आहे. या निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. याबाबतची व्याप्ती पाहता अपहारीत रक्कम अंदाजे सहा ते सात कोटी असल्याचे दिसत आहे. अपहाराची व्याप्ती पाहता, रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. 

अपहाराबाबत बँकेच्या काही अधिकाऱ्यांची टीम बनवून चौकशीचा फार्स केला जात आहे. त्यामुळे चौकशी पारदर्शकपणे होऊन अपहारित रक्कम वसूल होणे गरजेची आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारीची कारवाई होणे अपेक्षित आहे. शासनाचा निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला नसेल, तर तो निधी शासनाकडे परत पाठविण्याची जबाबदारी ही बँकेची आहे. तथापि, बँकेने व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

अपहारित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.

Web Title: Sack employees who cheat on drought fund says Sunil Farate 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.