मंत्री तानाजी सावंत, हसन मुश्रीफ यांची हकालपट्टी करा, माकपची मागणी
By संतोष भिसे | Published: October 10, 2023 03:28 PM2023-10-10T15:28:47+5:302023-10-10T15:53:11+5:30
शासकीय रुग्णालयात बळी गेलेल्या मृतांच्या वारसांना १० लाखांची भरपाई द्या
सांगली : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षांनी केली. शासकीय रुग्णालयांतील अनागोंदी, गैरकारभार आणि बेफिकीर धोरणांविरोधात मंगळवारी स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली, त्यावेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला.
किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. त्यांनी आरोप केला की, नांदेडसह राज्यातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत रुग्णांचे होणारे मृत्यू सरकारचे अपयश दाखवतात. सत्ताकारणात रमलेल्या राजकीय मंडळींना रुग्णांच्या जिविताशी देणेघेणे नाही. रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार धरुन सावंत व मुश्रीफ यांची मंत्रीपदांवरुन हकालपट्टी करावी.
यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यातील मागण्या अशा : शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणामुळे बळी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये भरपाई द्यावी. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले खासदार हेमंत पाटील यांना त्वरित अटक करा. शासकीय रुग्णालयांतील मृत्यूंच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सक्षम चौकशी समिती नियुक्त करा, न्याय्य तपासाविना कोणत्याही निरपराध कर्मचाऱ्यावर कारवाई करू नका. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी भरीव आर्थिक तरतूद करा. ती सुधारण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी.
आंदोलनात विजय बचाटे, भूपाल जोडहट्टी, सतीश साखळकर, वर्षा गडचे, नंदकुमार हत्तीकर, वर्षा ढोबळे आदी सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.