केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी
By संतोष भिसे | Published: October 3, 2023 05:58 PM2023-10-03T17:58:31+5:302023-10-03T17:59:42+5:30
मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण
सांगली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गुन्हेगार व्यक्तींना सरकारने पाठीशी घालू नये अशी मागणी केली.
किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगार आशिष मिश्रा मोकाट आहे. त्याचे वडील मंत्री अजय मिश्रा दबाव टाकत असल्याने ठोस कारवाईमध्ये अडचणी येत आहेत. मंत्रीपदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.
देशमुख यांनी सांगितले की, कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह याच्यासह अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कृत्य केंद्र सरकार करत आहे. उत्तर प्रदेशातील प्रशासन पूर्णत: गुन्हेगारांच्या हातात गेले आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा देशभर निदर्शने करत आहे.
सांगलीत निदर्शनामध्ये देशमुख यांच्यासह विजय बचाटे, नंदकुमार हत्तीकर, नितीन मिरजकर, उत्तम कुसळे, वसंत कदम, वर्षा गडचे आदी सहभागी झाले.