ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 04:54 PM2022-07-14T16:54:07+5:302022-07-14T16:55:02+5:30
या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते.
सांगली : भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या विलिनीकरणासाठी आंदोलन करुन जनतेला वेठीस धरले. त्यावेळी तुम्ही विरोधक होतात, आता तर तुमची सत्ता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत एसटीचे विलिनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.
धनाजी गुरव म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप आणि आर. एस. एस.चे सरकार आले आहे. या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत आणि गाेपीचंद पडळकरांचा मोठा पुढाकार होता. या दोन्ही नेत्यांना भाजपने मंत्री करण्याची गरज आहे. कारण, ते तत्काळ एसटीचे राज्य शासनाने विलिनीकरण करणार आहेत.
या सरकारमधील नेत्यांना एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणूनच दि. १५ जुलै रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. एक महिन्यात खोत आणि पडळकरांना एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण जमले नाही तर त्यांनी एसटी कर्मचारी आणि जनतेची माफी मागितली पाहिजे. अन्यथा या प्रश्नावर राज्यातील जनताच रस्त्यावर येईल, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.