शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 06:03 PM2020-12-24T18:03:25+5:302020-12-24T18:05:51+5:30

शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. 

sadabhau khot criticism on sharad pawar farmer agitation | शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोलपवारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपपवारांच्या आत्मचरित्रात शेतकरी कायद्यातीलच गोष्टी नमूद असल्याचं सदाभाऊ म्हणाले.

सांगली
"शरद पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल", अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन करतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. 

"पवार साहेबांचं काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करतात. त्यांनी जर म्हटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असं म्हटलंय. पण दुसरीकडे पवार म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय", असं सदाभाऊ खोत म्हणाले. 

नव्या कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजावून सांगण्यासाठी देशभरात भाजपच्या वतीने किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. आज सांगलीत या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते. 
 

Web Title: sadabhau khot criticism on sharad pawar farmer agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.