'निवडणुका आल्यावरच आमची आठवण...', सदाभाऊंचा खोतांचा भाजपला संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:56 AM2024-01-15T10:56:56+5:302024-01-15T10:59:46+5:30
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई- देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे, राज्यात महायुतीनेही तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. काल सांगलीतही महायुतीची बैठक झाली. या बैठकीत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाजपवर टीका केली आहे. 'निवडणुका आल्यावरच आमची आठवण येते, लग्न ठरल्यावरच बँडवाल्याची आठवण',असा टोला सदाभाऊ खोत यांनी भाजपला लगावला.
"तुम्ही आम्हाला काही दिले नाही तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी मुंबईत बैठकीला गेलो होतो, आम्हाला म्हणाले, कामाला लागा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. मग मी त्या बैठकीत विचारले, तुम्ही आम्हाला काय बँडवाला समजलात का? लग्न ठरल्यावरच बँडवाल्याची आठवण होते का?, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ८ दिवस अखंड रामनाम जप, ११ यजमान करणार ४५ नियमांचे कठोर पालन
'तुम्ही आमचा अपमान करु नका. आम्ही लढणारी माणसं आहोत, त्यामुळे मोदी आणि फडणवीसांसाठी आम्ही लढणार आहोत. म्हणून घटक पक्षांनाही सन्मान द्या. मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करु शकते, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
लोकसभेनंतर बघू-गोपीचंद पडळकर
या मेळाव्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, लोकसभेनंतर बघू पण तोपर्यंत तरी गोड बोला, त्यानंतर करेक्ट कार्यक्रम करावे लागणार आहेत. आपल्यात वैचारिक मतभेद असू शकतात. पण प्रत्येकाला इच्छा असते ती खासदारकीची प्रत्येकाने मत, इच्छा व्यक्त करा. पण लोकसभेच्या आधी ज्यांना ज्यांना तिकिट मागायचे त्यांमा मागा, ज्यावेळी कमळाचे जाहीर होईल त्याच्या मागे आपली ताकद उभी करा, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.