सदाभाऊ खोतना जशास तसे उत्तर देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:00+5:302021-09-08T04:32:00+5:30
सांगली : भाजपचे आ. सदाभाऊ खोत याचे पुत्र सागर खोत यांच्यासह चार गुंडांनी सोमवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ...
सांगली : भाजपचे आ. सदाभाऊ खोत याचे पुत्र सागर खोत यांच्यासह चार गुंडांनी सोमवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रवीकिरण माने यांच्या घरात घुसून त्यांच्यासह कुटुंबियांना बेदम मारहाण केली. ही गुंडागर्दी आम्ही खपवून घेणार नाही. चारही गुंडांना तात्काळ अटक करावी अन्यथा, आम्ही सदाभाऊ व त्यांच्या मुलाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेली चार दिवस राजू शेट्टी यांनी काढलेल्या पूरग्रस्तांच्या मोर्चावरून सोशल मीडियावरून वाकयुध्द सुरू होते. सोशल मीडियावर राजकीय टीका-टिपणी सुरू होती. सदाभाऊ खोत यांनीच प्रथम टिकेला प्रारंभ केला. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सुरू केले. ही टीका सदाभाऊ यांच्या बगलबच्चांना झोंबली.
यातून तांबवे येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते रवीकिरण माने यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हे आ. सदाभाऊ खोत यांच्या मुलाला अशोभनीय आहे. त्यांनी प्रथम कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, फसवणूक झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. याबाबत त्यांनी काहीतरी करावे.
कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण कशा पध्दतीने त्यांनी मॅनेज केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राज्यातील सर्वच नेत्यांवर सदाभाऊ टीका करतात, मग त्यांच्यावर टीका झाली तर ती सहन करायची, पचवायची तयारी त्यांनी ठेवायला हवी. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, अन्यथा तुमच्या घरावरही दगड पडायला वेळ लागणार नाही.
पोलिसांनी संबंधित सर्व गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करून सदाभाऊ व त्यांच्या मुलाला जशास तसे उत्तर देऊ. कारवाई न झाल्यास पोलीस ठाणीसुद्धा आमच्या तावडीतून सुटणार नाहीत. सदाभाऊंच्या घरावरही धडक मारू. आम्हाला कुणी कमजोर समजण्याची चूक करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.