सदाभाऊ खोत यांच्या मुलाची ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:35+5:302021-09-08T04:32:35+5:30

इस्लामपूर : पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर याने साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी ...

Sadabhau Khot's son beats Swabhimani activist | सदाभाऊ खोत यांच्या मुलाची ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास मारहाण

सदाभाऊ खोत यांच्या मुलाची ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास मारहाण

Next

इस्लामपूर : पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर याने साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण राजाराम माने (३५) यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी (दि. ६) रात्री ९ वाजेच्या सुमारास तांबवे (ता. वाळवा) येथे घडला. कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत, अभिजित भांबुरे, स्वप्निल सूर्यवंशी (तिघे रा. इस्लामपूर) आणि सत्यजित कदम (शिराळा) या चौघांवर गुन्हा नोंद केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, माने सोमवारी रात्री कुटुंबासोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी सागर खोत साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला. ‘तू सदाभाऊंवर टीका करतोस का, तुला मस्ती आली आहे का’, असे म्हणत त्याने माने यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी कुटुंबीय मधे पडल्याने हल्लेखोरांनी रविकिरण यांना ढकलून देत धक्काबुक्की, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने या चौघांनी चारचाकी मोटारीतून तेथून पोबारा केला. माने यांच्या फिर्यादीवरून कासेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेशी आपला काही संबंध नाही. सोमवारी रात्री ९ वाजता मी कोल्हापूरमध्ये होतो. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे. रविकिरण माने हा आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर नेहमी एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो. कदाचित त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असतील. मात्र तेथेही माने यानेच त्यांच्याशी उद्धट वर्तन केले आहे, असा खुलासा सागर खोत याने केला आहे.

Web Title: Sadabhau Khot's son beats Swabhimani activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.