शिक्षक बँक अध्यक्षपदी सदाशिव पाटील
By admin | Published: January 19, 2017 11:22 PM2017-01-19T23:22:05+5:302017-01-19T23:22:05+5:30
चुरशीची लढत : संघाचे शामगोंड पाटील यांचा पराभव; समितीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सत्ताधारी गटाचे सदाशिव आनंदराव पाटील यांची गुरुवारी निवड झाली. पाटील यांनी विरोधी शिक्षक संघाचे उमेदवार शामगोंड पाटील यांचा १३ विरूद्ध आठ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
शिक्षक बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी राजीनामा दिल्याने नव्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिक्षक समितीत चुरस होती. त्यात समितीच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची बैठक कोरमअभावी रद्द करण्यात आली होती. गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. गत बैठकीप्रमाणे ही बैठक पण होणार की नाही, असा संभ्रमही निर्माण झाला होता. पण अखेर अध्यक्ष निवडीला सत्ताधारी गटाचे सर्व तेरा संचालक उपस्थित राहिले.
निवडणूक निर्णय अधिकारी ए. व्ही. गराडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी समितीतून सदाशिव पाटील (पाडळी, ता. शिराळा) यांनी, तर विरोधी गटातून शामगोंड पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सदाशिवराव पाटील यांना १३, तर शामगोंड पाटील यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर समितीच्या संचालक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा नेते किसनराव पाटील, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत यांनी नूतन अध्यक्ष पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी मिरजकर म्हणाले की, बँकेतील विरोधक बिथरले आहेत. त्यांचे वैचारिक संतुलन बिघडले आहे. शिक्षक संघाला शिवाजीराव पाटील यांच्यासारखा नेता पुन्हा मिळणार नाही. सध्याच्या संघाला नेताच उरलेला नाही. खालच्या पातळीवर जाऊन संघाकडून राजकारण केले जात आहे. मृत सभासदाच्या नावावर कुभांड रचून राजकारण सुरू आहे. अशा मंडळींना शिक्षक सभासद कधीही थारा देणार नाहीत. ते कधीही नेतृत्व करू शकणार नाहीत. त्यांच्या कर्तृत्वानेच आम्हाला सभासद पुढील वीस वर्षे बँकेची सत्ता देतील. विरोधकांच्या आरोपांमुळे सभासदांचा बँकेवरील विश्वास कमी झालेला नाही. ठेवीत वाढ होत आहे. भविष्यात कुभांड रचणाऱ्या विरोधकांना तुरूंगाची हवा खावी लागेल.
किरण गायकवाड म्हणाले की, माजी अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी चांगले काम केले. बँकेची वाटचाल कॅशलेस व्यवहाराकडे सुरू आहे. त्यांच्या नव्या संकल्पना यापुढेही बँकेत राबविल्या जातील. यावेळी यु. टी. जाधव, शशिकांत बजबळे, अंजली कमाने उपस्थित होते (प्रतिनिधी)