सदाभाऊ, सत्ता कधी कायम नसते!
By admin | Published: January 2, 2017 11:30 PM2017-01-02T23:30:07+5:302017-01-02T23:30:07+5:30
जयंत पाटील : मंत्रीपदाची शिफारस करण्यासाठी केलेले फोन विसरले
तांदुळवाडी : नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीने शेतीमालाचे दर कोलमडून सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे नेते सत्तेत मश्गुल झाले आहेत, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा़ राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. सदाभाऊ आता माझ्यासह राजारामबापूंवर बोलू लागले आहेत़ सत्ता कधी कायम नसते आणि मंत्री करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करा, असे त्यांनी मला केलेले फोन ते विसरलेले दिसतात, असा टोलाही त्यांनी मारला़
बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आ़ पाटील यांच्याहस्ते २ कोटी २६ लाखांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते़ जि़ प़ उपाध्यक्ष रणजित पाटील, देवराज पाटील, बी़ के. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आ़ पाटील पुढे म्हणाले, या जि. प़ मतदार संघात पंचायत समितीची जागा मिळाली, मात्र जि़ प़ ची जागा गेलेली आहे़ सध्या मतदारसंघात अनेकजण आपणास मदत करणार आहेत़ उमेदवार सर्वांच्या मान्यतेने ठरवू. मात्र उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. तुमचा एकमेकावरील राग काढण्यात मला त्रास होतो़ सध्या कोणत्याही पक्षात माझा पराभव करू शकतात, असा विश्वास नाही़ त्यामुळेच ते सर्व तत्त्वांना मुरड घालून एक होत आहेत. मात्र पतंगराव कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत़ ते जातीयवादी पक्षांशी आघाडी करतील, असे वाटत नाही़
बी़ के. पाटील, सरपंच विलासराव देसावळे, पंचायत समिती सदस्या सौ़ शोभाताई देसावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी एम़ बी़ हताळे, राष्ट्रीय कबड्डीपटू अनिकेत बेनाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते भूपाल घोरपडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच बाजीराव जाधव यांनी प्रास्ताविक केले़ राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव पाटील, युवक अध्यक्ष संजय पाटील, ढवळीचे शरद पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक दिलीपराव पाटील, अॅड़ विश्वासराव पाटील, बाबासाहेब पाटील, जालिंदर जाधव, संपतराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते़
माजी पं़ स़ सदस्य बाजीराव बेनाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)