सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:21 AM2017-08-08T00:21:23+5:302017-08-08T00:21:23+5:30

Sadebhau's support for taking action against Jade | सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच पारडे जड झाल्याचे दिसत आहे.
शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलेल्या फुटीरतावाद्यांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. सरकारमध्ये जाऊन मंत्रिपदावर विराजमान होताना शेतकरी चळवळीशी बेईमानी केली तर, त्याची फळे त्यांना भोगावी लागणारच. असाच प्रकार सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत घडल्याने शेतकरी नाराज होते. राजू शेट्टी यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आता त्यांनी संघटनेत लोकांना घेताना तपासून घ्यावे.
- बाळासाहेब कुलकर्णी, संस्थापक नेते,
शेतकरी संघर्ष परिषद, सांगली
स्वत:च्या हितासाठी संघटना चालविणाºयांचा फुगा आता फुटलेला आहे. हे कधी ना कधी होणार होतेच. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच मुळी तडजोडीच्या राजकारणावर अवलंबून आहे. सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचा मुद्दा हा व्यक्तिगत स्वार्थापोटीच्या भांडणाचा मुद्दा आहे. दोन नेत्यांमधील व्यक्तिगत वादातून ही घटना घडली आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी युती केली. त्यांच्या या युतीचा शेट्टींना कोणताच फायदा झाला नाही. त्यामुळे संघर्षाचा जन्म झाला. आंदोलनेसुद्धा स्वार्थी भावनेने केल्यामुळे आज त्यांच्या संघटनेवर ही वेळ आली आहे. भविष्यातही त्यांना अनेक परिणामांना सामारे जावे लागेल.
- संजय कोले, नेते, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)
चळवळीवरचा विश्वास : संपुष्टात येईल
शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे म्हणाले की, सदाभाऊंची हकालपट्टी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर, शेतकरी चळवळीची इतकी बदनामी झाली नसती. ज्यावेळी सदाभाऊंवर गंभीर आरोप होत होते, त्यावेळीही कारवाई झाली नाही. या कारवाईबरोबरच राज्य सरकारनेही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. असे लोक जर चळवळीत राहिले, तर शेतकºयांचा चळवळीवरील विश्वास उडून जाईल. सत्तेच्या मोहापायी चळवळीला वेठीस धरण्याचे काम सदाभाऊंकडून घडल्यामुळे आणि अनेकप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानेच ही कारवाई झाली आहे.

शेतकरी चळवळीमध्ये धोकादायक माणसं ठेवल्यामुळे चळवळीचे नुकसान होते, याचे सदाभाऊ खोत हे उदाहरण आहे. त्यांच्या संघटनेतून हकालपट्टीच्या निर्णयाला मोठा विलंब झाला. खासदार राजू शेट्टी यांना हा उशिरा सुचलेला शहाणपणा म्हणावा लागेल. चळवळी या शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या जीव असतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे असते. या सर्व घटकांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रेम केले होते, मात्र दोघेही आता एकमेकांशी संघर्ष करून संपून जातील, ही शेतकºयांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.
बी. जी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

स्वा िभमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोघांचे बोट धरून आम्ही शेतकरी चळवळीत आलो. पुणतांब्याचे शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मोडले. शेतकºयांचे आंदोलन मोडणाºयांबरोबर सदाभाऊ राहणे, ही गोष्टच न रुचणारी होती. त्यामुळे आजचा निर्णय संघटनेला घ्यावा लागला आहे. या गोष्टी घडायला नको होत्या.
- विकास देशमुख, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सांगली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कोणताही निर्णय घेत असताना संघटनेअंतर्गत लोकशाहीची पद्धत अवलंबिण्यात येते. त्यानुसार दोन्ही बाजूंनी विचार करून म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊन घेतलेला हा निर्णय आहे. संघटनेत राहायचे असेल, तर प्रत्येक कार्यकर्त्याला धोरणांची, विचारांची चौकट सांभाळावीच लागते.
- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Sadebhau's support for taking action against Jade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.