अध्यात्म-विज्ञानाची सांगड घालणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:32+5:302021-07-20T04:19:32+5:30
या ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारधारेतील आप्पांनी समाजसेवेची शिक्षणगंगा सर्वसामान्यांच्या दारी कर्मवीर भाऊरावांप्रमाणे महाराष्ट्रात आणली. आश्रमशाळा, महाविद्यालये, आयुर्वेद, नर्सिंग, इंजिनिअरिंग, फार्मसी, ...
या ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारधारेतील आप्पांनी समाजसेवेची शिक्षणगंगा सर्वसामान्यांच्या दारी कर्मवीर भाऊरावांप्रमाणे महाराष्ट्रात आणली. आश्रमशाळा, महाविद्यालये, आयुर्वेद, नर्सिंग, इंजिनिअरिंग, फार्मसी, तंत्रनिकेतन अशा बहुआयामी व्यावसायिक शिक्षण उपक्रमातून विद्यार्थी घडविण्याचे काम १९९४पासून अव्याहत सुरु आहे.
शिक्षणाची, शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे, त्यांचा व्यवहारातील उपयोग, व्यावसायिकता याचा स्वत: अभ्यास करून तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ते मार्गदर्शन करत असतात. हे करत असताना सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेतील प्रत्येक कर्मचारी, विद्यार्थी, पालक या प्रत्येकाची वैयक्तिक माहिती, परिचय आणि गुणवत्ता यांचा गुणग्राहकतेने उत्तम उपयोग करून घेतला जातो. संस्था हे कुटुंब मानणारे आप्पा संस्थेतील शिपायापासून अध्यक्षांपर्यंत सर्वांचा एकदिवसीय कर्मचारी मेळावा भरवून कौटुंबिक कौतुक सोहळा करतात, हेही आप्पांच्या कल्पनेचेच फलित.
आयुर्वेदीय औषधीकरण, रूग्णसेवा, व्यवस्थापन याबाबतीत शिस्तीचा कटाक्ष असणाऱ्या आप्पांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी रूग्णालयात गरीब, गरजू रूग्णांना आजही मोफत चिकित्सा, भोजन व्यवस्था सुरू आहे. चिमणभाऊ डांगे आणि प्राचार्य सरांच्या सूचनेनुसार पंचकर्म, शस्त्रक्रिया, कायाचिकित्सा, स्त्रीरोग आदी विभाग उत्तम सेवा देत आहेत.
दीनदयाळ सूतगिरणीच्या माध्यमातून स्वत:च्या उत्तम कारखानदारीचा परिचय आप्पांनी करून दिला. ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ हीच त्यांची शिकवण पुढील पिढीला प्रेरणादायी आहे. ॲड. चिमणभाऊ, विश्वासबापू आणि त्यांच्या सर्व कन्या उच्चशिक्षण घेऊन निरनिराळ्या पदांवर कार्यरत आहेत. आप्तेष्टांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे.
अर्धांगिनी सुभद्राबाई डांगे यांची साथ अर्ध्यात सुटल्यावरही आप्पांनी आपले संपूर्ण लक्ष सामाजिक व आध्यात्मिक जीवनाकडे वळवले व ती पोकळी भरून काढली.
‘माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी’
अशी आस उरात बाळगून लहानपणापासून पंढरीची वारी करणारे आप्पा वारकरी आहेत. आपल्या निष्ठेमुळे, संतसेवेमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष झाले. त्यावेळीही त्यांनी वारकऱ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी बहुमोल कार्य केले.
अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून वास्तविकतेचे भान असणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी आप्पांची ओळख आहे. आष्टा-इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यात त्यांनी माेठे संघटन उभारले आहे. नगर जिल्ह्यात पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे पुण्यभूमी, कर्मभूमी करण्यासाठी गेले काही वर्षे त्यांनी पाठपुरावा चालवला आहे.
अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी भव्य शिल्पकृती साकारण्यात आली आहे. यासाठी आप्पांनी माेठे याेगदान दिले आहे. तेथील दुष्काळी भागाच्या विकासासाठी आश्रमशाळा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी आप्पा नेहमीच प्रयत्नशील असतात. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून चाैंडी परिसराच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
मातोश्री अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित त्यांनी रचलेला ‘गीत अहिल्यायन्’ हा पोवाडा अवघ्या महाराष्ट्रात गाजतो आहे. समाजबांधवांच्या उत्थानाची कळकळ, त्यासाठी केलेला अखंड पाठपुरावा यामुळे अण्णासाहेब डांगे यांचे नाव धनगर समाजात अतिशय आदराने घेतले जाते.
संघ जीवन गाथा, कळलं का? समजलं का? उमजलं का? अशा पुस्तकांव्दारे लेखक म्हणून आप्पांनी स्वत:ची छाप समाजावर पाडली. यामुळे ‘कृष्णाकाठाचे वांगे आणि इस्लामपूरचे अण्णासाहेब डांगे’ अशी म्हण प्रचलित झाली.
आपल्या लेखांनी, कवितांनी, पुस्तकांनी आप्पांनी वाड्मयसेवाही तितक्याच प्रगल्भतेने केली आहे. अभ्यासपूर्ण व्याख्याने, प्रवचने करण्यासाठी लागणारी तयारी, टिपणे, वाचन यासाठी त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. धाडसीपणा, निर्भिडपणा आणि सातत्य या गुणांनी त्यांनी समाजासमाेर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहे.
पहाटे उठून नित्य व्यायाम, देवपूजा, न्याहारी आदी उरकून दैनंदिन कामकाजासाठी ते वेळेवर उपस्थित राहतात. वयाच्या, आजाराच्या, प्रकृतीच्या कोणत्याही कारणास्तव त्यांनी या दिनक्रमामध्ये खंड पाडलेला नाही.
वयाच्या ८५ व्या वर्षीसुध्दा त्याच उत्साहाने आप्पांचे झालेले दर्शन खरोखर प्रेरणा देणारे ठरते.
- प्रा. डॉ. अशोक वाली,
मा. श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आष्टा