तासगाव तालुक्यात ज्ञानरचनावादी शिक्षणाचा श्रीगणेशा
By admin | Published: January 1, 2016 11:26 PM2016-01-01T23:26:07+5:302016-01-02T08:28:49+5:30
जिल्हा परिषद शाळांचे एक पाऊल पुढे : तालुक्यातील पहिलीच्या १४२ शाळांत अंमलबजावणी - गुड न्यूज
दत्ता पाटील-- तासगाव--काही वर्षांपूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सीलने व्हायचा. अलीकडच्या काळात हे साहित्य इतिहासजमा झाले. त्याची जागा वही-पेनने घेतली. याहीपुढे जात काही शाळांत डिजिटल शिक्षण पध्दतीची सुरुवात झाली. मात्र तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिकवण्याच्या पध्दतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. मुलांना वही-पेनमध्ये अडकवून न ठेवता, अभ्यासक्रमाच्या रचनेवर आधारित प्रात्यक्षिक मांडणी केलेल्या शिक्षण पध्दतीचा अंगिकार केला आहे. एक जानेवारीपासून तालुक्यातील सर्व १४२ शाळांतील पहिलीच्या वर्गात नावीन्यपूर्ण ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २०१० पासून अंमलबजावणी करण्यात आली. मुलांच्या क्रियाशीलतेला वाव देऊन, मुलांनी स्वत: क्रिया करुन नव्याने ज्ञानाची निर्मिती करावी, या उद्देशाने शिक्षण पध्दतीला सुरुवात झाली. मात्र अपवाद वगळता प्रत्यक्षात कोठेच अंमलबजावणी दिसून आली नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील कुमठे केंद्रातील शाळांतून ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीने मुलांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून आला. त्यानंतर राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्ञानरचनावाद पध्दतीवर लक्ष केंद्रित केले.कुमठे पॅटर्ननुसार तासगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, या हेतूने तासगावातील ढवळी आणि मणेराजुरी जिल्हा परिषदेच्या शाळांत ज्ञानरचनावादाच्या मॉडेल शाळा तयार करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिलीत शिकविणाऱ्या शिक्षकांच्या बारावेळा कार्यशाळा घेण्यात आल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा यशस्वी ठरल्यानंतर एक जानेवारीपासून तालुक्यातील सर्व पहिलीच्या वर्गात ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे लवकरच जिल्ह्यात ज्ञानरचनावादाचा तासगाव पॅटर्न तयार होणार हे निश्चित.
अशी झाली सुरुवात
कुमठे पॅटर्नचा आदर्श नजरेसमोर ठेवून गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी तालुक्यातील सर्वच शाळांत ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. विस्तार अधिकारी डॉ. विमल माने आणि विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांच्या सहकार्याने नियोजन करुन एक जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात पहिलीच्या सर्व शाळांत त्याची सुरुवातदेखील केली.
काय आहे ज्ञानरचनावाद
प्रगत राष्ट्रांत ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीनेच शिक्षण दिले जाते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये भारतात ज्ञानरचनावाद स्वीकारण्यात आला. मुलांना कसे शिकवायचे, याऐवजी मुले कशी शिकतील, याचे उत्तर म्हणजेच ज्ञानरचनावाद. ज्ञानाची मांडणी करुन अनुभवावर नवे ज्ञान मिळवणे म्हणजेच ज्ञानरचनावाद. या पध्दतीने मुलांना केवळ शिक्षकांनी शिकवण्याऐवजी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकण्याची जबाबदारीच मुलांवर येते. अशा पध्दतीचा अवलंब झाल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारल्याचे चित्र दिसून आले आहे.