साहेब, मराठा समाजाला आरक्षण द्या!
By admin | Published: September 27, 2016 10:24 PM2016-09-27T22:24:40+5:302016-09-28T00:46:44+5:30
मोर्चातील युवतींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठपुराव्याचे आश्वासन
सांगली : मराठा क्रांती मोर्चाची विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होताच दहा मुलींच्या शिष्टमंडळाने सव्वाअकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले़ ‘साहेब, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि कोपर्डी (जि़ अहमदनगर) येथील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या’, अशी मागणी या मुलींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे यावेळी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात अक्षया पाटील, चैताली घोरपडे, विश्वजा शिंदे, प्रियांका एडके, स्नेहल पवार, किरण कदम, अंकिता मोहिते, सुश्मिता पै, ऋतुजा माने, मोहिनी शिंदे यांचा समावेश होता़ मुलींच्या या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली़ कोपर्डी येथील मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली़ शेखर गायकवाड यांनी शिष्टमंडळातील मुलींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून मागण्या सोडविण्यासाठी निश्चित शासनाकडे प्रयत्न केला जाईल, मागण्यांचे निवेदन तातडीने राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले़ तुमच्या मागण्यांचा शासन गांभीर्याने विचार करेल, असेही आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले़ (प्रतिनिधी)