अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले; कुटुंबाची आर्थिक कोंडी
By संतोष भिसे | Published: May 21, 2023 03:28 PM2023-05-21T15:28:57+5:302023-05-21T15:29:55+5:30
राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही
सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दरमहा ५ तारखेपूर्वी यांना मानधन मिळायला हवे असा शासनाचा अध्यादेश आहे, तरीही त्याचे पालन होत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दोन महिने मानधन नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
मार्च आणि एप्रिल या महिन्यांचे मानधन मिळण्याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. मानधनासाठी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर केंद्राच्या हिश्श्याची मार्च महिन्याची ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली. मात्र राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अनेक अंगणवाड्यांमध्ये कर्मचारीच पोषण आहार बऱ्याच शिजवून देतात. कार्यालयीन कामकाजाचा खर्च, तालुक्याला बैठकांसाठीचा याचा खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याची बिले वेळेत तयार न केल्याने काही तालुक्यांचे पैसे परत गेले. ते परत केव्हा मिळणार? याची शाश्वती नाही.
वाढीव मानधनाचा पत्ताच नाही
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधानात वाढीची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या मानधनापासून होणार होती. या महिन्याचे मानधन १ हजार ५०० रुपयांनी वाढून येणार होते. पण ते जमा झालेच नाही.
वाढत्या महागाईत अंगणवाडी कर्मचारी एकेक रुपयासाठी महाग आहेत. या स्थितीत सरकारने प्रत्येक महिन्यात ५ तारखेला मानधन जमा केले पाहिजे. प्रशासकीय खर्चाची बिलेही वेळेत दिले पाहिजेत. पण सध्या खेळखंडोबा सुरु आहे.
- कमलताई परुळेकर, अंगणवाडी कर्मचारी महासभा