जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांचे वेतन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:07+5:302021-05-10T04:27:07+5:30
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिवावर उदार होऊन १०२ रुग्णवाहिका चालक ‘देवदूत’ म्हणून दिवस-रात्र काम करत आहेत. शिवाय वेगवेगळ्या ...
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिवावर उदार होऊन १०२ रुग्णवाहिका चालक ‘देवदूत’ म्हणून दिवस-रात्र काम करत आहेत. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना मानसिक आधार व मदत करून सामाजिक बांधिलकी जपतात. सध्या जिल्हा परिषदेच्या १०२ कंत्राटी रुग्णवाहिका या ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका चालकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाते.
या चालकांचे मानधन मार्च महिन्यापासून कंपनीकडून मिळत आहे. तर फेब्रुवारी महिन्यांपर्यंत ठेकेदाराकडून मानधन मिळत होते. कंपनीकडून मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन मिळाले नाही. तर ठेकेदाराकडून जानेवारी, फेब्रुवारीचे मानधनही दिले नाही. शिवाय ठेकेदाराकडून भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे या चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
चौकट :
आंदोलनाचा इशारा
आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करत असून ठेकेदाराकडून अन्याय होत आहे. चार महिन्यांपासून पगारही नाहीत. समान काम समान वेतन मिळावे. आमची नेमणूक राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत किंवा जिल्हा परिषदेमार्फत व्हावी. चार महिन्यांचा पगार व मागील काळातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम देऊन आमची आर्थिक कोंडी संपवावी, अन्यथा काम बंद आंदोलन करू, असा इशारा सांगली जिल्हा कंत्राटी रुग्णवाहिका चालक संघटनेने दिला आहे.