मायबाप सरकार..! आमचा पगार कधी होणार?, एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:57 PM2023-01-12T15:57:48+5:302023-01-12T15:58:22+5:30
आठ ते बारा तास काम करूनही वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी नाराज
सांगली : जिल्ह्यातील एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर २०२२ या महिन्यातील पगारासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. शासनाकडून निधीच मिळाला नसल्यामुळे चार हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगारच झाले नाहीत. यामुळे मायबाप राज्य सरकार..! आमचा पगार कधी होणार, असा सवाल एसटी कर्मचारी करू लागले आहेत.
जिल्ह्यातील दहा आगारांतील एसटीची प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत चालू आहे. चांगले उत्पन्न मिळत असूनही डिझेलचे वाढते दर, जुन्या बसेसची देखभाल दुरुस्तीमध्येच बहुतांशी निधी खर्च होत आहे. यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी शिल्लक राहत नाही. यामुळे एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पगारासाठी राज्य शासनाच्या निधीचीच गरज आहे.
दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार नेहमी होत होते; पण गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. आठ ते बारा तास काम करूनही वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी नाराज आहेत. त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
यामुळे एसटी महामंडळातील कर्मचारी मायबाप सरकार..! आमचा पगार कधी मिळणार, असा सवाल राज्य शासनाकडे करत आहेत. जानेवारी २०२३ चे ११ तारीख आली तरीही डिसेंबर २०२२ मधीलच पगार मिळाला नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये : अशोक खोत
एसटी कर्मचारी कुटुंबाचा विचार न करता प्रवाशांची सेवा करत आहेत. ग्रामीण भागामध्ये एसटी हीच प्रमुख प्रवासाचे साधन आहे. यामुळे राज्य शासनाने नफा-तोट्याचा विचार न करता एसटी वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले पाहिजेत. यासाठी शासनाने वेळेवर निधी देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी केली.