सांगली महापालिकेच्या २०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनकपातीचे आदेश; आयुक्तांचा दणका
By शीतल पाटील | Published: October 12, 2023 11:20 AM2023-10-12T11:20:08+5:302023-10-12T11:20:40+5:30
सांगली : शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत ‘स्वच्छताही सेवा- २०२३’ कार्यक्रमास गैरहजर राहणारे अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, ...
सांगली : शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत ‘स्वच्छताही सेवा- २०२३’ कार्यक्रमास गैरहजर राहणारे अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह तब्बल २०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनकपातीचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी दिले. या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेत महापालिकेचे तब्बल शंभरहून अधिक सफाई कर्मचारीही गैरहजर होते.
मागील १ ऑक्टोबर रोजी शासनाने देशव्यापी स्वच्छता मोहीम जाहीर केली होती. आयुक्त सुनिल पवार यांनी याबाबत खातेप्रमुख, अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची दोन-तीनवेळा बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या दिवशी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश दिले होते. असे असताना लाख-दीड लाख रुपये वेतन असणाऱ्या प्रतिनियुक्तीवरच्या अधिकाऱ्यांनीही दांडी मारली. सफाई कर्मचाऱ्यांनीही या अभियानाकडे पाठ फिरवली. यात मानधनावरचे कर्मचारीही मोठ्या संख्येने गैरहजर होते. आयुक्त पवार यांनी या दिवशी गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला. यानंतर या सर्व त्यांचे एक दिवसाचे वेतनकपातीचे आदेश काढले.
उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, शासनाने स्वच्छता पंधरवडाअंतर्गत स्वच्छता ही सेवा-२०२३ हा उपक्रम महात्मा गांधींना त्यांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला आदरांजली म्हणून देशभरात १ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला होता.
हा उपक्रम सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे नियाेजन हाेते. यासाठी सर्व विभागांतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या स्वच्छतेच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्षात कामकाज करण्याबाबत आयुक्तांचे निर्देश होते. तरीही उपस्थित न राहिल्याने कारवाई करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.